टीम AM : बॉलिवूड अभिनेत्री टीना अंबानी म्हणजेच टीना मुनीम यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1958 ला झाला. टीना अंबानी यांचं लग्नापूर्वीचं नाव टीना मुनीम असं असून त्यांनी 1970 – 80 चा काळ गाजवला आहे. टीना मुनीम या नावाने एकेकाळी सिनेप्रेमींना वेड लावले होते. 1975 साली टीना यांनी फेमिना टीन प्रिन्सेस इंडियाचा किताब जिंकला.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या बॉलिवूडमध्ये आल्या.1978 मध्ये देव आनंद यांच्या ‘देश परदेस’ मधून टीना यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर देव आनंद यांच्यासोबत लुटमार आणि मनपसंद असे सिनेमे त्यांनी केले. 1981 मध्ये टीना मुनीम व संजय दत्त यांचा ‘रॉकी’ रिलीज झाला. ‘रॉकी’ हा संजय दत्तचा पहिला सिनेमा होता. याच चित्रपटाच्या सेटवर संजय व टीना यांच्यात प्रेम फुलले. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले. टीना यांनी कर्ज, अधिकार, पुकार, मनपसंद यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. पुढे राजेश खन्नासोबतही टीना यांचे नाव जोडले गेले. यानंतर टीना मुनीम यांच्या आयुष्यात अनिल अंबानींची एन्ट्री झाली.
टीना व अनिल अंबानी यांची लव्हस्टोरी कोणत्या परिकथेपेक्षा कमी नाही. दोन अनोळखी व्यक्तीची भेट, मग प्रेम, मग घरच्यांचा विरोध अशा अनेक चढऊतारानंतर दोघांचे प्रेम लग्नाच्या मुक्कामापर्यंत पोहोचले. एका लग्नात अनिल अंबानींनी टीना मुनीम यांना पहिल्यांदा पाहिले होते. टीना यांना पाहताच अनिल त्यांच्यात हरवून गेले होते.
अनिल यांना टीना यांच्यासोबत लग्न करायचे होते. पण अंबानी कुटुंबाचा या लग्नाला प्रखर विरोध होता. अभिनेत्रीसोबत लग्न हे अंबानी कुटुंबाला मान्य नव्हते. कुटुंबाच्या मर्जीपुढे अनिल अंबानींचे काहीही चालले नाही. साहजिकच यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. पण 1989 साली अमेरिकेत भूकंप आला आणि या भूकंपाने टीना व अनिल यांना पुन्हा एकत्र आणले.
होय, अमेरिकेच्या लॉस एंजिल्समध्ये मोठा भूकंप आला होता. यादरम्यान टीनाही अमेरिकेत होत्या. अनिल यांना हे कळताच ते चिंतातूर झाले. त्यांनी कसाबसा टीना यांचा नंबर मिळवला आणि त्यांची विचारपूस केली. या फोननंतर टीना व अनिल अंबानी यांच्यात नव्याने प्रेमाची पालवी फुटली. आता मात्र दोघांच्या प्रेमापुढे अंबानी कुटुंबाचा विरोध गळून पडला. कुटुंबाने दोघांच्या लग्नासाठी संमती दिली आणि 1991 साली टीना मुनीम टीना अंबानी झाल्या.
लग्नाआधी टीना यांनी सुमारे 35 सिनेमांत काम केले. पण लग्नानंतर त्यांनी बॉलिवूड व ग्लॅमर इंडस्ट्रीला रामराम ठोकला. टीना व अनिल यांना जय अनमोल व जय अंशुल अशी दोन मुले आहेत. सध्या टीना अंबानी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल चालवत आहेत. याशिवाय त्या हार्मनी फॉर सिल्व्हर्स फाऊंडेशनचे काम करतात. तसेच त्या अनेक वर्षांपासून हार्मनी आर्ट शोचे आयोजनही करत आहेत.
शब्दांकन : संजीव वेलणकर