पत्रकार वारिसे यांच्या हत्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही – मुख्यमंत्री, एसआयटी गठीत करण्याचे आदेश : उपमुख्यमंत्री

मुुंबई : पत्रकार वारिसे यांच्या हत्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही, आरोपीला कायद्याने शिक्षा होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते कोल्हापूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. 

पत्रकार जीव धोक्यात घालून काम करतात, त्यामुळे पत्रकार वारिसे यांच्यावर हल्ला करणाऱ्याला कोणत्याही प्रकारे पाठिशी घातलं जाणार नाही. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कायद्यानुसार शिक्षा होणारच असल्याचं त्यांनी सांगितलं.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या गाडीला झालेल्या अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विषेश तपास पथक – एसआयटी गठीत करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही समिती गठीत करण्यात येणार असून ही समिती या अपघाताची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे.