तुर्कस्तान भूकंपातील मृतांचा आकडा 16 हजारांच्या पार : अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली

AM टीम : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत 16 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकट्या तुर्कस्तानमध्ये 9057 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर दुसरीकडे सीरियामध्ये 2662 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भुकंपामध्ये 34 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच, इमारतींच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी मदत आणि बचाव पथके रात्रंदिवस काम करत आहेत.

भूकंपामुळे बेघर झालेल्या लोकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच, पाऊस पडत असून बर्फवृष्टी होत आहे. आग्नेय तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये 7.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे बाधित झालेल्या बहुतेक लोकांनी मशिदी, शाळा किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी आश्रय घेतला आहे. विशेष म्हणजे बेघर झालेल्या लोकांसमोर अन्न व इतर समस्याही निर्माण झाल्या आहेत.

तुर्कस्तानच्या भूकंपग्रस्त भागात आता सुमारे 60 हजार कर्मचाऱ्यांचे बचाव पथक काम करत आहेत. परंतु, बरेच लोक अजूनही मदत पोहोचण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी बुधवारी भूकंपग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी, ‘आमच्या एकाही नागरिकांना आम्ही रस्त्यावर सोडणार नाही. पीडितांना शक्य ती सर्व मदत केली जाईल. देशातील 8.5 कोटी लोकांपैकी 1.3 कोटी लोक प्रभावित झाले आहेत’, असे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी सांगितले.