राज्य सरकारने घेतला निर्णय
मुंबई : भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व असून, आजी – आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशानं पुढच्या वर्षापासून दहा सप्टेंबर या दिवशी सगळ्या शाळांमध्ये, आजी – आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
शालेय शिक्षण तसंच मराठी भाषा विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती देताना ते काल बोलत होते. राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
यानुसार प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातल्या शिक्षण सेवकांना सोळा हजार रूपये, माध्यमिक वर्गात अठरा हजार रूपये तर उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातल्या शिक्षण सेवकांना वीस हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येईल. हे मानधन एक जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येत आहे. मराठी भाषा विभागाच्या वतीनं मराठी भाषा भवन उभारलं जाणार असल्याची माहिती केसरकर यांनी यावेळी दिली.