भीषण अपघात : टायर फुटल्याने कार पलटली, 7 जणांचा मृत्यू

आग्रा : आग्रा येथून ताजमहाल बघून परत येत असलेल्या कारला उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण 7 जणांचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या लोकांपैकी 4 जण एकाच कुटुंबातील आहे. तर अन्य 3 व्यक्ती या मृत परिवातील एका व्यक्तीच्या सासरवाडीच्या असल्याचं समजतं. एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह गावामध्ये आणण्यात आले तेव्हा गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. या अपघातामध्ये एक छोटा मुलगा सुदैवाने वाचला आहे.

उन्नावमध्ये पोस्टमार्टम करण्यात आल्यानंतर शनिवारी तीन मृतदेह बासौली या मुळ गावी पोहचले. समोर घरातील चारजणांचे मृतदेह पाहून मरण पावलेल्या व्यक्तीच्या म्हताऱ्या बापाबरोबरच वयस्कर नातेवाईकांची शुद्ध हरपली. मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव दिनशे असं आहे. दिनेशच्या कुटुंबातील एकूण 5 जण या गाडीमध्ये होते. यापैकी केवळ एक छोटं मुलं या अपघातामध्ये वाचलं. या अपघातामध्ये दिनेशची सासू आणि दोन मेव्हण्यांचा मृत्यू झाला आहे. आग्रा येथील ताजमहाल पाहून बाराबंकीला परत येत असताना कारला अपघात झाला. उन्नावजवळ भरधाव वेगातील या कारचे टायर फुटल्याने गाडी पलटली.

31 जानेवारी रोजी दिनेश पत्नी अनीता सिंह (34), मुलगी गौरी उर्फ संस्कृति (9), मुलगा आर्यन (4), लक्ष्यवीर (10 महिने), सासू कांती (52), मेहुणी प्रीती (15), प्रिया (9) यांच्याबरोबर आपल्या कारने आग्रा येथून परत येत होता. आपला तीन दिवसांचा दौरा पूर्ण करुन हे सर्वजन शुक्रवारी रात्री कारने बाराबंकीला येत होते. दिनेशच कार चालवत होता. याच वेळी गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाला आणि गाडीतील 8 पैकी 7 जणांचा मृत्यू झाला. 

या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून या चौघांच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण गाव गोळा झाल्याचं चित्र पहायला मिळालं. संपूर्ण कुटुंब अशाप्रकारे एका रस्ते अपघातात दगावल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.