अंबाजोगाई : येथील समर्थनगर मध्ये हळदी – कुंकवाच्या माध्यमातून महिलांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली. या आगळ्यावेगळ्या हळदी – कुंकवाच्या माध्यमातून समर्थनगर मधील महिलांनी लतादीदींच्या स्वरांची जादू सात स्वर, स्तंभ, सात वाद्य, सप्तसूर व लतादीदी यांच्या रांगोळीतून साकारलेल्या चित्राचं अनोख प्रदर्शन अतिशय सुंदर रितीने मांडणी करून भरवण्यात आलं आहे.
या अनोख्या उपक्रमात लतादीदींच्या वयाची एकूण 93 दिवे प्रत्येक स्त्रीच्या हातून लावण्यात आले होते. कानावर लतादीदींचा सूर येत होता. त्याचबरोबर त्यांच्या आवडत्या साध्या पांढऱ्या साडीची वेशभूषा अर्थातच सगळं वातावरण अगदी सप्तसुरांनी भरून गेलं होतं.
या कार्यक्रमास जवळपास पाचशे महिलांनी सहभाग नोंदवला. उपक्रमात लतादीदींचा आवडीचा चाट म्हणजेच पाणीपुरी प्रत्येकाला देण्यात आली. या अनोख्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. या उपक्रमात रूपाली देशमुख (मुकदम) दीपा माहुरकर, मंजू जोशी, जयश्री देशमुख, रतन परळकर, नलिनी पोखरीकर व स्मिता कुलकर्णी या महिलांचा सहभाग होता.