मुख्याधिकारी, कंत्राटदारावर कामगारांचा रोष
अंबाजोगाई : नगरपरिषदेच्या स्वच्छता कंत्राटदाराने आश्वासन देऊनही थकीत वेतनाची रक्कम अदा न करता तुटपुंजी रक्कम हातात दिल्याने कंत्राटी सफाई कामगारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पसरला आहे. थकीतपैकी किमान एक महिन्याचे वेतन पूर्ण मिळेपर्यंत कामावर येणार नसल्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे. त्यामुळे शहरात अजूनही काही प्रभागात स्वच्छतेचे ‘तीनतेरा’ वाजले आहे. दुसरीकडे जनतेतून ओरड होत असल्याने नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने काही खाजगी कामगारांची जुळवाजुळव करून काही भागातील कचरा उचलण्यास आजपासून सुरुवात केली आहे, अशी माहिती मिळाली आहे.
नगरपरिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांचे मागील तीन महिन्यांपासून कंत्राटदाराने वेतन थकविले आहे. वेतन थकविल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. थकीत वेतनासाठी कामगारांनी कंत्राटदाराकडे विचारपूस केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांचे दार ठोठावले. परंतू, त्यांनीही कामगारांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
सगळीकडूनचं अवहेलना होत असल्याने अखेर या सफाई कामगारांनी नगरपरिषदेसमोर आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला थकीत बिलापैकी पाच लाख रुपये देऊन प्राधान्याने कामगारांचे वेतन करण्याची अट घालू असे जाहीर आश्वासन गुरुवारी झालेल्या बैठकीत दिले. त्यामुळे बैठकीत ठरल्यानुसार आंदोलनकर्ते सर्व कामगार दुसऱ्या दिवशी पहाटे कामावर हजर झाले. मात्र, कंत्राटदाराने त्यांची हजेरीही घेतली नाही आणि त्यांना कामही दिले नाही. तसेच, नगरपालिकेने पाच ऐवजी दहा लाख रुपये देऊनही कंत्राटदाराने दिवसभर कामगारांना पैशासाठी मागे फिरवले आणि अखेर सायंकाळी तुटपुंजी रक्कम कामगारांच्या हातावर ठेवली. त्यामुळे कामगारांचा मुख्याधिकारी, कंत्राटदारावर प्रचंड रोष वाढला आहे.
थकीत वेतनापैकी किमान एक महिन्यांचेे वेतन मिळाल्याशिवाय कामावर परतणार नसल्याचा निर्धार स्वच्छता कामगारांनी केल्याची माहिती प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अशोक गंडले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सुटत नसल्याने अंबाजोगाईकरांना आणखी काही दिवस अस्वच्छतेला तोंड द्यावे लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.