पारंपारिक पध्दतीला फाटा देत गुरुदेव सेवा आश्रमाला मदत देवून साजरी केली संक्रांत

‘स्वाराती’ च्या ‘मेडिकल टिचर्स’ चा अनोखा उपक्रम

अंबाजोगाई : संक्रांत निमित्ताने पारंपारिक पध्दतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम करुन खर्चाला फाटा देत घाटनांदुर येथील गुरुदेव सेवा आश्रमास भरघोस आर्थिक मदत करित येथील ‘स्वाराती’ ‘मेडिकल टिचर्स’ नी एकत्रित येऊन मकर संक्रांती साजरी केली.

येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ‘मेडिकल टिचर्स’ गेली अनेक वर्षांपासून मकर संक्रांतीचा उत्सव पारंपारिक पध्दतीला फाटा देवून साजरी करतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी – कुंकवाचा कार्यक्रम अगदी साध्या पध्दतीने साजरा करुन त्या निमित्ताने जमवलेली रक्कम एखाद्या गरजू संस्थेला देवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने संक्रांतीचा सण साजरा करतात. 

‘स्वाराती’ च्या ‘मेडिकल टिचर्स’ डॉ. सुनिता बिराजदार, डॉ. दिपाली देशपांडे, डॉ. सुनिता शेट्ये, डॉ. शिला गायकवाड, डॉ. दिपाली बर्दापुरकर, डॉ. निलीमा भिसे, डॉ. सविता तोष्णिवाल, डॉ. वर्षा दहिफळे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. मोहिनी जोगदंड, डॉ. पुष्पा कावळे या सर्वांनी एकत्र येत घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमास भेट देत येथील सभागृहात टाइल्स बसवण्यासाठी आर्थिक मदत देवून आश्रमातील सर्व सदस्यांना भोजन देवून त्यांच्या सोबत भोजनाचा आस्वाद घेतला. 

यावेळी आश्रमाचे प्रमुख दासलालजी महाराज, गुरुमाय बहिणाबाई दहिवाळ, शामाताई गुरुदेव दहिवाळ, यमुनाबाई सोनवणे यांचा ‘मेडिकल टिचर्स’ नी त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करित त्यांचा सत्कार केला. या नंतर सर्व ‘मेडिकल टिचर्स’ नी आश्रमातील वृध्द सदस्यांसोबत संक्रांती निमित्ताने आयोजित तीळाच्या पोळ्यांसह भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी आश्रमातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती.