अंबाजोगाई : विविध मागण्यासाठी निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ ने कालपासून संप पुकारला आहे. सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचं, निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. मोडकळीस आलेल्या वसतीगृहांची दुरुस्ती, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या तसंच इतर रिक्त जागांची भर्ती, तसंच महागाई भत्ता तत्काळ अदा करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी संप करण्यात आल्याचं संघटनेकडून कळवण्यात आलं आहे.
दरम्यान, संघटनेच्या विविध मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक असून, अनेक मागण्या तत्काळ मंजूर करत असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. संघटनेनं फार ताणून धरु नये, असं आवाहन करताना, ते म्हणाले..
‘तुमच्या अर्ध्या मागण्या तर मी आत्ता मंजूर करतोय, तात्काळ मंजूर करतोय. हॉस्टेलचा विषय आणि पाचशे कोटी रुपयांसाठी मी उद्या परवाच केंद्राकडे जातोय. दुरुस्तीसाठी बारा कोटी रूपये आम्ही पीडब्ल्यूडीकडे दिलेले आहेत. त्याचंही चार आठ दिवसामध्ये टेंडर निघेल दुरुस्तीचं. आम्ही सगळ्या गोष्टीसाठी पॉझिटीव्ह आहोत. परंतु फार आपणही ताणू नका. काय असेल आमच्याशी बोला आणि विषय संपवा.’
महाजन यांच्या आवाहनानंतरही ‘मार्ड’ संघटनेनं आपल्या भूमिकेवर ठाम राहत, संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काल सायंकाळी जारी केलेल्या पत्रात संघटनेनं आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं. अंबाजोगाई इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे काल सकाळपासून निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरु आहे.