‘मार्ड’ : ‘स्वाराती’ च्या निवासी डॉक्टरांचा संप, रुग्णसेवा विस्कळीत

रुग्णालयासमोर धरणे आंदोलन : 172 निवासी डॉक्टर सहभागी

अंबाजोगाई : ( मार्ड ) निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे शासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्यामुळे राज्यातील सर्व शासकीय व पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संपाचा बडगा उगारला आहे. सोमवारी ‘स्वाराती’ रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे तर निवासी डॉक्टरांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ‘स्वाराती’ रुग्णालयातील 172 निवासी डॉक्टर संपावर आहेत.

महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय व पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे निवासी डॉक्टरांची हेळसांड होत आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांचा पदनिर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी धुळखात पडला आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य अधांतरी राहिले आहे.

बंदोपत्रित सेवेचे थोथांड कशाला ? असा प्रश्न निवासी डॉक्टरांनी उपस्थिती केला आहे. सहयोगी प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरणे, शासन निर्णयाप्रमाणे लागू झालेला महागाई भत्ता शासनाने तात्काळ अदा करावा. सध्या महाराष्ट्रातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनाची तफावत दुर करून निवासी डॉक्टरांना समान वेतन (एल लाख रूपये) लागु करून निवासी डॉक्टरांना न्याय द्यावा. या समस्या मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे निवेदनाद्वारे कळवून देखील शासन या प्रश्नावर गंभीर नसल्यामुळे आम्ही सर्व राज्यातील निवासी डॉक्टर सोमवार पासुन संपावर जाणार आहोत.

या संपकाळात रूग्ण व्यवस्थेवर परिणाम झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल, अशा इशारा अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल मुंडे, डॉ. जव्हेरीया शेख, डॉ. अनुश्री केन, डॉ. अजित अरबट आदींनी दिला आहे.

रुग्णसेवा विस्कळीत 

दरम्यान, संपकाळात अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, बाल अतिदक्षता विभाग यासारख्या आपत्कालीन सेवा सुरु राहणार आहेत. अत्यवस्थ रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात कुठलीही अडचण होणार नसल्याचे मार्ड संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

संघटनेच्या विविध मागण्यांवर विचार सुरू : गिरीश महाजन

दरम्यान, संघटनेच्या विविध मागण्यांवर विचार सुरू असून, अनेक मागण्या तत्काळ मंजूर करत असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. संघटनेनं संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.