डोस घेण्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन
अंबाजोगाई : चीनमध्ये वाढणाऱ्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात आरोग्य विभागाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य यंत्रणेलाही खबरदारीच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोविड वाढल्यानंतर डोस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत होत्या. अशी परिस्थिती असतांना येथील ‘स्वाराती’ रुग्णालयातील कोविड लस केंद्रावर पहिला व दुसरा डोस घेतलेल्या 39 हजार 864 लाभार्थ्यांनी अद्याप कोविडविरोधी लसीचा तिसरा अर्थात प्रीकॉशन (बूस्टर) डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे.
कोविड संसर्गामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच्यावर उपाय म्हणून आरोग्य विभागाने नागरिकांना कोविड लसीचा डोस देणे सुरु केलेले आहे. हा डोस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होऊन लांब रांगा केंद्रावर लागत होत्या. पहिला व दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यानंतर बूस्टर डोस दिला जातो. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यासह तालुक्यातील कोरोना नियंत्रणात आहे. त्यामुळे लसीकरणाची गतीही मंद आहे.
येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात असलेल्या कोविड लस केंद्रावर पहिल, दुसरा डोस घेणारे 39 हजार 864 नागरीक प्रीकॉशन (बूस्टर) डोस घेण्यासाठी फिरकलेच नाहीत. यामुळे फ्रंटलाइन, हेल्थकेअर वर्कर आणि सहव्याधी असणाऱ्या ज्येष्ठांनी प्राधान्याने प्रिकॉशन डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
बूस्टर डोसला अल्प प्रतिसाद
येथील ‘स्वाराती’ रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या केंद्रावरून आतापर्यंत 85 हजार 420 जणांना मोफत डोस देण्यात आला आहे. त्यामध्ये पहिला डोस 42 हजार 914 जणांना, दुसरा डोस 39 हजार 456 तर तिसरा डोस 3 हजार 50 जणांना देण्यात आला आहे. यामध्ये कोविसील्ड 43 हजार 392, कोवॅक्सिन 41416 तर कॉरबेहॅक्स 612 जणांना हा डोस देण्यात आला आहे. हा डोस देण्यासाठी या केंद्राचे माजी केंद्रप्रमुख डॉ. प्रशांत दहिरे यांचे मोठे सहकार्य लाभले होते. तिसरा डोस 3 हजार 50 लोकांनी घेतला असून कोरोना संसर्ग कमी झाल्याने हा डोस कमी प्रमाणात नागरिकांनी घेतला आहे. नुकतीच चीनमध्ये नव्याने साथ उद्भवल्याने तिसरा डोस घेण्यासाठी नागरिक येऊ लागले आहेत, असे या केंद्राचे प्रमुख डॉ. योगेश माने यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. असे असले तरी जिल्ह्यात कोणतीही भीतीदायक स्थिती नाही. त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी अधिकची खबरदारी म्हणून आधीच सुरक्षित राहण्यासाठी बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. – डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता ‘स्वाराती’ रुग्णालय, अंबाजोगाई.