ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन : वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज पुण्यात निधन झालं, ते 77 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यानंतर काल त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती, मात्र अंतर्गत अवयव निकामी झाल्यानं, त्यांचा मृत्यू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

विक्रम गोखले यांच्या निधनानं अभिनय क्षेत्रासह समाजाच्या सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली, वैविध्यपूर्ण भूमिका करणारे गोखले यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे, तर गोखले यांच्या निधनानं अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं, या शब्दांत फडणवीस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. 

औरंगाबाद इथले ज्येष्ठ सिने पत्रकार अशोक उजळंबकर यांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करताना, रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी असा तिहेरी प्रवास आपल्या अभिनयाच्या बळावर यशस्वी करणारा अभिनयसम्राट पुन्हा होणे नाही, असं म्हटलं आहे.