इंदू मिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम मार्च 2024 पूर्वीच पूर्ण करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या मुंबईतील दादर इथल्या ‘राजगृह’ निवासस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. डॉ. आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केलं. राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 

यावेळी बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी आंबेडकर यांच्याशी काही विषयांवर चर्चाही केली. ही फक्त सदिच्छा भेट होती, या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये, असं मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या वास्तूत आल्यावर एक वेगळंच समाधान लाभलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या या भेटीत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाविषयी चर्चा झाल्याचं आंबेडकर यांनी माध्यमांना सांगितलं. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांशी राजकीय युती करण्याची शक्यता आंबेडकर यांनी फेटाळून लावली. महाविकास आघाडी प्रतिसाद देणार नसेल, तर स्वबळावर निवडणुका लढवण्याचे स्पष्ट संकेतही आंबेडकर यांनी दिले.

दरम्यान, राजगृहापाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इंदू मिल परिसरात उभारल्या जात असलेल्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. स्मारकाचं काम मार्च 2024 पूर्वीच पूर्ण होऊन स्मारक तयार व्हावं, असा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.