राज्य शासनाने काढले परीपत्रक
प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार – कॉ .बब्रुवाहन पोटभरे
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील भोगवटाधारकांची मालकी हक्कात नोंद करावी आणि बेघर नागरिकांसाठी रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मागील तब्बल 35 वर्षांपासून कम्युनिस्ट पक्ष व निवारा हक्क समिती हे विविध निवेदने देवून, आंदोलने करून आणि मोर्चे काढून लढा देत आहेत. या प्रदीर्घ लढ्याला काही अंशी यश मिळाले असून महाराष्ट्र सरकारने या प्रश्नी नुकतेच परीपत्रक काढले आहे. असे असले तरी जोपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आमचा लढा आम्ही सुरूच ठेवणार आहोत, अशी माहिती ज्येष्ठ कम्युनिस्ट पक्ष नेते व निवारा हक्क समितीचे निमंत्रक कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी दिली.
ज्येष्ठ कम्युनिस्ट पक्ष नेते व निवारा हक्क समितीचे निमंत्रक कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वात मागील अनेक वर्षांपासून घरकुल योजनांची अंमलबजावणी करावी, भोगवट्यातील घरे मालकी हक्कात घ्यावीत, बेघर, वंचित, बहुजन, सर्वहारा वर्गाला न्याय मिळावा, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी कम्युनिस्ट पक्ष व निवारा हक्क समिती लढा देत आहेत. 2019 पासून या लढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झालेले, वेळोवेळी झालेली आंदोलने आणि प्रचंड मोर्चातून दिसून आले आहे. वर्ष – 2022 मध्ये 14 फेब्रुवारी, 24 मार्च, 16 एप्रिल, 14 मे आणि नुकतेच 7 नोव्हेंबर या कालावधीत अंबाजोगाई नगरपरिषद, तहसिल कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून पाच आंदोलने केली आहेत.
याकामी काॅ. पोटभरे यांना निवारा हक्क समितीचे राजाराम कुसळे, विनोद शिंदे, भागवत जाधव, गजराबाई गोरे, शेख अनिस, रवि आवाडे, उषाबाई आदमाने, प्रदिप कोरडे, आशाबाई आदमाने, वंदना प्रधान, धिरज वाघमारे, नागाबाई जोगदंड, संतोष पवार (पारधी), सुमेध वाघमारे, शेख रहीम यांच्यासह कम्युनिस्ट पक्षाने नेहमीच पुढाकार घेऊन अंबाजोगाई शहर व परिसरातील सुमारे 18 ते 20 हजार बेघर नागरिकांसाठी व्यापक लढा उभारलेला आहे. या बेघर नागरिकांत सर्व जाती धर्माचे लोकं आहेत.
अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर, लालनगर, कबीरनगर, पंचशील नगर, कैकाड गल्ली, वडारवाडा, शिकलकरी, पारधी, दवाखाना झोपडपट्टी, मोंढ्यातील वस्ती यासह शहरातील भोगवट्यातील गल्ली, वस्त्या आणि नगरांचा समावेश आहे. यांच्यासाठी कम्युनिस्ट पक्ष व निवारा हक्क समितीच्या वतीने अतिशय उग्र आंदोलन करण्यात आले आहे. तीव्र स्वरूपातील जनआंदोलन होवूनही याबाबत अंबाजोगाई नगरपरिषदेने निवारा हक्क समितीच्या मागणीनुसार अद्यापही कोणतीच कार्यवाही केली नाही, बेघरांना सहकार्य केले नाही. कोणतीच सकारात्मक पावले उचलली नाहीत.
मागील शेकडो वर्षांपासून अंबाजोगाई शहरात अनेक वस्त्या या रहिवास करून असल्या तरीही त्या भोगवट्यातच आहेत. असे असले तरी कम्युनिस्ट पक्ष व निवारा हक्क समितीच्या लढ्याला अंबाजोगाई शहरातील वर्तमानपत्र, न्युज चॅनेल ही प्रसारमाध्यमे सामाजिक बांधिलकीतून सातत्याने सहकार्य करीत आहेत. तसेच 1997 साली सेशन कोर्टाने निकाल देवून क्रांतीनगर येथील 244 लोकांना काबीज केले आहे, अशी माहिती ज्येष्ठ कम्युनिस्ट पक्ष नेते व निवारा हक्क समितीचे निमंत्रक कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी दिली.
लवकरच मोठे जनआंदोलन करण्यात येईल
अंबाजोगाई शहरातील दहा हजाराहून अधिक घरे ही भोगवटा रकाण्यात नोंदविली गेल्याने भोगवटाधारक नागरिकांना मालकी हक्काच्या रकाण्यात त्यांचे नांव नसल्याने कोणत्याही योजनांचा लाभ आणि फायदा होत नाही. हे नागरिक शासनाच्या अनेक योजनांपासून कायमच वंचित आहेत. अंबाजोगाई शहरात शेकडो वर्षांपासून रहिवास असलेल्या विविध झोपडपट्या आहेत. ज्यात विविध जातीधर्माचे लोक राहतात. नगरपरिषद, अंबाजोगाई यांना सर्व मूलभूत सुविधा देऊन त्यांच्याकडून कर वसुली करते. परंतू, नगरपरिषदेने यांची घरे अद्याप ही मालकी हक्कात लावली नाहीत. सन 2022 अखेर पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करण्याचे सरकारचे धोरण असताना अंबाजोगाई शहरात अंदाजे 10 हजार घरे ही भोगवट्यातच आहेत. ती मालकी हक्कात नसल्याने या योजनेचा लाभ शहरातील गोरगरिबांना झाला नाही. नगरपरिषदेने मोजणी कार्यालयाचे आदेश न पाळल्याने गोरगरिब जनता सरकारी लाभांपासून वंचित राहिली आहे. बेघरांसाठी व प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी चालू वर्षात आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. त्यामुळे जोपर्यंत गरजू, गोरगरीब, वंचित व बेघर नागरिकांना घरकुल मिळणार नाहीत, तसेच जोपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमचा लढा आम्ही सुरूच ठेवणार आहोत, लवकरच या प्रश्नावर मोठे जनआंदोलन करण्यात येईल याची शासन व प्रशासनाने नोंद घ्यावी. – कॉ. बब्रुवाहन पोटभरे, निमंत्रक – निवारा हक्क समिती,अंबाजोगाई.