मुंबई : राज्यातल्या शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी आत्तापर्यंत चार हजार सातशे कोटी रुपयांची वाढीव दरानं मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये पावसानं झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं आहे. पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत.
जून – जुलैपासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 40 लाख 15 हजार 847 शेतकऱ्यांना सुमारे चार हजार सातशे कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. ही मदत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त आणि दोन ऐवजी तीन हेक्टर अशी वाढीव आहे.