अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून जनजीवन विस्कळित झाले आहे. ग्रामीण भागात कालपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना याचा ऐन सणासुदीच्या काळात मोठा फटका बसला आहे.
अंबाजोगाई तालुक्यात कालपासून पावसाने थैमान घातले आहे. दिवसभर ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडत आहे. दुपारनंतर अचानक काळेकुट्ट ढग भरून येऊन रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक गावांतील नदीनाले तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली असून सोयाबीनचे पीक संपूर्णतः पाण्याखाली गेलेले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव, तळेगाव घाट, पिंपरी, फावडेवाडी यासह अनेक गावांतील शेतातील सोयाबीनचे साठवलेले ढीग पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे. पावसामुळे संपूर्ण खरीप हंगामातील पिके नष्ट होत आलेली आहेत व यामुळे शेतकरी वर्ग हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
अंबाजोगाई शहराजवळून वाहणाऱ्या वाण नदीलाही रात्रीच्या पावसामुळे पूर आला. त्यामुळे अंबाजोगाईहून येल्डाकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद होती. अजूनही अंबाजोगाई शहरासह तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.