अंबाजोगाई : दिवाळीचा सण अवघ्या दोन – तीन दिवसांवर येऊन ठेपला असून अंबाजोगाई शहरातील पाण्याचे नियोजन पुर्णपणे कोलमडले आहे. मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले असतानाही अंबाजोगाईकरांना 10 ते 12 दिवसाला पाणी पुरवठा केला जात आहे. शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना करण्यात आली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील विविध भागातील पथदिवे बंद असून वारंवार सांगूनही नगरपरिषद प्रशासन चालू करत नाही, हे पथदिवे त्वरित चालू करण्यात यावे. तसेच शहरात मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे, यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. शहरातील प्रत्येक रस्त्यावर पाण्याच्या लिकिजेसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेले आहे, कंत्राटदार योग्य काम करत नसल्याने लिकिजेसमुळे रस्ते खराब होत असून पाणीही वाया जात आहे. या सर्व बाबींमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात सर्व विषयांबाबत चर्चा करून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनिल लोमटे, सारंग पुजारी, ताहेर भाई, बाला पाथरकर, शोयेब कुरेशी, दिग्विजय लोमटे, संजय गायसमुद्रे, मयूर रणखांब, राहुल कापसे, जुनेद एनबी, शाहरुख भाई, आदिल भाई, अहमद पप्पूवाले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.