अंबाजोगाई : मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला आहे. हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतलेला आहे. अगोदरच मराठवाड्यामध्ये गोगलगायींच्या संकटामुळे व लम्पी आजारामुळे शेतकरी बांधव हा खूप मोठ्या संकटात सापडलेला होता. गोगलगायींच्या हल्ल्यामुळे दोन – तीन वेळेला पेरणी करावी लागली होती. त्यामध्येच बीड जिल्ह्यामध्ये पिकविमा व नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे.
पेरणीसाठी व मशागतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे झालेले नाही. त्यातच कसेबसे खरीप हंगामाचे पिक काढणीला आले, त्यावेळी संततधार पाऊस सुरू झाला व गेल्या आठ – दहा दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे.
सोयाबीनचे पीक संपूर्णतः पाण्याखाली गेलेले असून कापूस पिकाचे सुद्धा अतोनात नुकसान झालेले आहे. संपूर्ण खरीप हंगामातील पिके नष्ट होत आलेली आहेत व यामुळे शेतकरी वर्ग हा अतिशय खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतीच्या पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत शासनाने ताबडतोब करावी, अन्यथा अगोदरच शेतकरी आत्महत्यामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये मराठवाडा हा एक नंबरला असल्यामुळे या शेतकरी बांधवांच्या आत्महत्यांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जर शेतकरी बांधवांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून प्रती हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथर शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.