मांजरा धरणाचे मुख्य कार्यालय बीड जिल्ह्यातच ठेवावे : राजकिशोर मोदी
अंबाजोगाई : धनेगाव येथील मांजरा धरण हे बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याची तहान भागवते. धरण बीड जिल्ह्यात असल्याने त्याचे मुख्य कार्यालय हे बीड जिल्ह्यातच असावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली आहे. मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने आज धरणाची पाहणी करत मोदींनी जलपूजन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मांजरा धरणाच्या पाण्याचे जलपूजन केल्यानंतर माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मागील साधारणतः 40 वर्षांपूर्वी स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे मांजरा धरणाची निर्मिती झाली. पुढच्या 50 वर्षांसाठीच्या पाण्याचे नियोजन करून या धरणाची निर्मिती करण्यात आली होती. येणाऱ्या 2030 – 31साली या धरणाची मुदत संपणार आहे. सध्याच्या काळात धरणाच्या भिंतीला काही ठिकाणी तडे जात आहेत. यामुळे पुढे होणारा धोका टाळण्यासाठी शासनाने धरण पुनर्जीवनाच्या कामास सुरुवात करावी, अशी मागणी मोदी यांनी शासनाकडे केली आहे. तसेच अंबाजोगाई शहरातंर्गत असलेली व अतिशय जीर्ण झालेली पाईपलाईन बदलण्यासाठी तात्काळ शासनाने मंजुरी द्यावी, अशी मागणी देखील मोदी यांनी केली आहे.
मांजरा धरण लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरले आहे. धरणाच्या निर्मितीपासून 14 ते 15 वेळेस धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मागील सलग तीन वर्षांपासून मांजरा धरण हे परतीच्या पावसाने भरत आहे. मागच्या काळात पाऊस कमी झाल्याने धरण कोरडे पडले होते. त्यामुळे चर खोदून पाणी ओढण्याची वेळ आली होती. मात्र, आता मांजरा धरण आज पुर्ण क्षमतेने भरल्याने अंबाजोगाई शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले.
मांजरा धरणाच्या जलपूजनासाठी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, डॉ. नरेंद्र काळे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, तानाजी देशमुख, मनोज लखेरा, सुनिल व्यवहारे, गणेश मसने, शेख मोईन आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.