अंबाजोगाई – येल्डा रस्ता तात्काळ दुरुस्त करा : ग्रामस्थांचे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन

रणजित कांबळेला न्याय मिळालाच पाहिजे, या घोषणांनी परिसर दणाणला

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिले निवेदन

अंबाजोगाई : अंबाजोगाई – येल्डा या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एका कोवळ्या वयातील मुलाचा जीव गेल्यानंतर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली असून आज या भागातील ग्रामस्थांनीही उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. 

या आंदोलनातील रणजित कांबळेला न्याय मिळालाच पाहिजे, या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. दरम्यान ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. अंबाजोगाई – येल्डा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, या प्रमुख मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले.

उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई – येल्डा रस्त्यासाठी वारंवार निवेदने देऊनही यावर कुठलीही कार्यवाही होत नाही. या रस्त्याचे काम संबंधित गुत्तेदाराला देऊन अनेक वर्षे झाली आहेत. तरीही ‘त्या’ गुत्तेदाराने अद्याप काम सुरु केले नाही. रणजितच्या मृत्यूला गुत्तेदारच जवाबदार आहे, त्यामुळे सदरिल गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि रणजितच्या कुटूंबाला सर्वोतपरी मदत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे शैलेश कांबळे, खाजामिया पठाण, अनिल कांबळे, अमोल हतागळे, गोविंद मस्के, अक्षय भुंबे यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.