मुकुंदराज परिसरात ट्रॅक्टरची ट्रॉली झाली पलटी : १५ जण गंभीर जखमी
अंबाजोगाई : अंबाजोगाईत आज सकाळी हृदयद्रावक घटना घडली. ऊसतोडणीसाठी मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने एका कोवळ्या वयातील मुलाला आपला जीव गमवावा लागला. मुकुंदराज परिसरात दिनांक 30 सप्टेंबरला पहाटे ही घटना घडल्याने अंबाजोगाईतील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुकुंदराज परिसरातील हा येल्ड्याकडे जाणारा रस्ता चांगला असला असता तर ‘त्या’ कोवळ्या वयातील मुलाचा जीव गेला नसता. ही घटना घडल्यानंतर अंबाजोगाईतील सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अंबाजोगाई शहराला जोडणारी रस्ते अजून किती जणांचा जीव घेणार ? असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील साखर कारखान्याकडे ऊसतोड कामगार घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्राॅली मुकुंदराज परिसरात पलटी झाली. या भीषण अपघातात 11 वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला तर अन्य 15 जण गंभीर जखमी असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. मृत्यू झालेल्या मुलाचं नाव रणजित अमोल कांबळे असं असून त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लोकप्रतिनिधींंचे, अधिकाऱ्यांचे रस्त्यांच्या प्रश्र्नाकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई शहरातील अंतर्गत आणि शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. आजघडीला शहराला जोडणाऱ्या चारीही बाजूंच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता नगरपालिकेत येतो, तो सार्वजनिक बांधकाम विभागात येतो, तिकडचा वनविभागात येतो, अशी कारणं सांगून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वेळ मारुन नेण्याचं काम करित आहेत. या रस्त्यांची कामे महिनोन्महिने रेंगाळत चालली आहेत. कुठंतरी अपघात झाला आणि कोणाचा जीव गेला तर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी खडबडून जागे होतात. मग सुरु होतो डागडुजीचा खेळ. रस्ता दुरुस्त करण्यासाठी कोणाचा बळीच द्यावा लागतो का ? त्याशिवाय रस्ते दुरुस्तीचे कामं होत नाहीत का ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. लोकप्रतिनिधींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना थोड्या जरी सामाजिक संवेदना असतील तर पुढचा कोणाचा बळी जाण्याअगोदर रस्त्यांची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.