‘गुड न्यूज’ : अंबाजोगाई उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्रावरून लवकरच ‘एफएम’ ची सेवा सुरू होणार : केंद्राची मान्यता

‘एफएम’ साठी 9 कोटी 65 लाखांची तरतूद

‘गावकरी’, ‘अंबाजोगाई मिरर’ च्या माध्यमातून सातत्याने केला होता पाठपुरावा

अंबाजोगाई : अंबाजोगाई उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्रावरून लवकरच ‘एफएम’ ची सेवा सुरू करण्यात येणार आहे. केंद्रातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने याला मान्यता दिली असून यासाठी 9 कोटी 62 लाख रुपायांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्रावरून ‘एफएम’ ची सेवा सुरू होण्यासाठी ‘गावकरी’, ‘अंबाजोगाई मिरर’ च्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. अगदी दोन दिवसांपूर्वीच यासाठी पुढाकार घेऊन पत्रकारांच्या वतीने खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना निवेदन देण्यात आले होते. त्यांनीही यासाठी पुढाकार घेत वेळोवेळी प्रयत्न केले होते.

केंद्रातील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने देशातील 14 राज्य व एका केंद्रशाषित प्रदेशात मिळून आकाशवाणी विभागाद्वारे हाेणारे माहिती प्रसारण, करमणूक, शैक्षणिक, आराेग्य आदी ज्ञानवाहक 41 फ्रिक्वेन्सी माॅड्यूलेशन (एफएम) केंद्रांना नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यात महाराष्ट्रातून एकमेव बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाई येथील उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्राचा समावेश आहे. ‘एफएम’ केंद्र सुरू करण्यासाठी 9 काेटी 62 लाख रुपयांच्या निधीसह मान्यता देण्यात आली आहे. या माहितीला अंबाजाेगाई (पिंपळा) दूरदर्शन केंद्राचे प्रभारी उपसंचालक एस. व्ही. चापुले यांनी दुजाेरा दिला आहे. या केंद्रावर 10 किलाे वॅटचे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या ठिकाणी पूर्वीपासूनच दूरदर्शनचा 150 मीटर उंच मनाेरा आहे. इतरही यंत्रणा कार्यान्वित आहे. 

पुढील आठ ते नऊ महिन्यात ‘एफएम’ केंद्र सुरू हाेण्याची शक्यता प्रशासकीय यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे. देशातील इतर ठिकाणच्या तुलनेत अंबाजाेगाई केंद्राची क्षमता माेठी असेल. त्यापेक्षा माेठे गुजरातच्या भूजमधील आहे. तेथे 20 किलाे वॅटचे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. देशातील ज्या राज्यात मान्यता देण्यात आलेली 41 केंद्र आहेत, त्यामध्ये 1, 5, 10, 20 किलाे वॅट क्षमतेच्या केंद्रांचा समावेश आहे, अंबाजोगाई येथील उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्रावरून लवकरच ‘एफएम’ ची सेवा सुरू होणार असल्याने रेडिओ प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.