अंबाजोगाई तालुक्यात जनावरांमध्ये ‘लंपी’ स्कीनचा प्रार्दुभाव : आठवडी बाजारावर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध

अंबाजोगाई : तालुक्यात ‘लंपी’ स्कीनचा प्रार्दुभाव धसवाडी गावात दिसून आल्यामुळे याची खबरदारी म्हणून शहरातील जनावरांच्या भरणार्‍या आठवडी बाजारावर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध जारी केले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत जनावरांच्या आठवडी बाजारांना स्थगिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आदेश दिले आहेत.

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनावरांमध्ये (गोवर्गीय व म्हैसवर्गीय) ‘लंपी’ स्कीन या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बीड जिल्ह्यातील विविध आठवडी बाजारातील जनावरांच्या बाजारावर निर्बंध घातले होते. याच रोगाची लागण असलेले विविध जनावरे तालुक्यातील धसवाडी आढळून आले ओहत. याचा अहवाल सहायुक्त पशुसंवर्धन रोग अन्वेषण विभाग, पुणे यांनी दिला असून त्या अनुषंगाने आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र सत्येंद्र प्रताप सिंग यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना आदेशित केले असून अंबाजोगाई शहरात मंगळवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार यावर निर्बंध घालण्यात यावेत, असे आदेश दिल्यानंतर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारच्या आठवडी बाजारावर निर्बंध घातले आहेत. 

या बाजारात कुठलीही जनावरे आणू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहेत. ‘लंपी’ स्कीन या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाच्या पशुसंवर्धना विभागामार्फत काळजी घेण्यात येत असून सर्व शेतकऱ्यांनी या बाजारामध्ये आपली गोवर्गीय व म्हैसवर्गीय ही जनावरे आणू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

संबंधीत लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी सदरील जनावराच्या गोठ्यामध्ये डास, माशा, गोचीड, चिलटे प्रसारित होवू नये, या संबंधी उपाययोजना राबवून या रोगावर नियंत्रण मिळवावे तसेच जनावरांना एकत्र चालण्यावर व चरण्यासाठी सोडू नये, बाधित पशुधनाच्या अंगावर 40 मिली नीम तेल व करंज तेल सम प्रमाणात 10 लिटर पाण्यात साबणाच्या भुकटी सोबत द्रावण करून लावावे. त्यामुळे या आजाराला नियंत्रण मिळविता येईल, असे पशु संवर्धन खात्याकडून कळविण्यात आले आहे. 

सध्या बीड जिल्ह्यामध्ये जनावरांना ‘लंपी’ स्कीन रोगाचा प्रार्दुभाव वाढू लागल्यामुळे ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्या मार्फत गावामध्ये जनजागृती सुरू असून या रोगाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय रूग्णालयास संपर्क साधावा, असे आवाहन अंबाजोगाई बाजार समितीचे प्रशासक गोविंदराव देशमुख, प्रभारी सचिव दिनकर नांदुरकर यांनी केले आहे.