धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या अभियंत्याचा पाण्यात बुडून मृत्यू : गावावर शोककळा

अंबाजोगाई : मौजे सेलू येथील अभियंत्याचा नाशिक येथील त्र्यंबकेश्वर दुगारवाडी धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार दिनांक 8 ऑगस्टला सायंकाळी घडली असून मृत्यू झालेल्या अभियंत्याच नाव अविनाश हरिदास गरड (वय 40) असे आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सेलू गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, अविनाश गरड यांच्यासोबत धबधबा परिसरात अडकलेल्या अन्य 22 पर्यटकांची सुखरूप सुटका प्रशासनाने केली आहे.

अविनाश गरड हे सेलू येथील रहिवासी असून नोकरी निमित्त ते नाशिक येथे स्थायिक झाले होते. काल रविवारची सुट्टी असल्याने त्यांच्यासह नाशिकहून 28 जण त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी धबधब्यावर पर्यटनासाठी गेले होते. अशात सांयकाळी मुसळधार पावसाचा जोर वाढल्याने, धबधबा ओलांडून गेलेल्यापैकी 5 जण कसे बसे आले आणि उर्वरित 23 जण पलिकडच्या बाजूला अडकून राहिले होते.

पावसाचा आणि पुराचा जोर कमी होईल, या आशेवर वाट पहात बसल्याने रात्री त्यांचा धीर खचू लागला होता. यावेळी अविनाश गरड हे धबधब्यात पडले, पाण्यात वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.