पाटोदा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
अंबाजोगाई : तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथील जि. प. प्राथमिक शाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत तसेच लोक वर्गणीतून सर्वच विद्यार्थ्यांना मोफत 2 संच शालेय गणवेश वितरण करण्यात आले. पाटोदा (ममदापूर) येथे सोमवार, दिनांक 1 ऑगस्ट रोजी सत्यशोधक आण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.
प्रारंभी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच गोविंद जामदार, अविनाश उगले, व्यंकटराव उगले, शिरीष मुकडे, आकाश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते धिमंत राष्ट्रपाल, कैलास पाडुळे, विष्णू सरवदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर पाटोदा येथील जि. प. प्राथमिक शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख व सरपंच बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते प्रत्येकी 2 संच शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पाडुळे, उपाध्यक्ष चंद्रकांत यादव तसेच शालेय समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य व मुख्याध्यापक एम. ए. शेख व शिक्षकवृंद, पालक उपस्थित होते. नवीन गणवेश मिळाल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, सरपंच बाळासाहेब देशमुख आणि उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पाडुळे, उपाध्यक्ष चंद्रकांत यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद यांनी मिळून व पुढाकार घेऊन लोकसहभाग गोळा केला. त्यांच्या या समाजाभिमुख उपक्रमाला पाटोदा गावचे ग्रामस्थ आणि पालक वर्गाने भक्कम साथ दिली. यातून शंभर टक्के शालेय गणवेश वाटप करणे, शाळा दुरूस्ती, ई – लर्निंग अशा विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देत पाटोदा जि. प. शाळा ही अंबाजोगाई तालुक्यात एक नामांकित शाळा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्याबद्दल माजी सभापती देशमुख यांनी सर्वांचे जाहीर कौतुक केले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्या शिक्षण सभापती पदाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शासन व लोकसहभागातून विद्यार्थ्यांना 2 गणवेश व शालेय साहित्य वाटप केले, विज्ञान प्रदर्शन आयोजित केले, शिक्षक व शिक्षिकांसाठी मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित केले. असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण करते. विविध सुविधा व साहित्य हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत पूरक ठरतील, विद्यार्थ्यांना सकस शालेय पोषण आहार दिला जातो, असे सांगून देशमुख म्हणाले की, आजची पिढी अतिशय भाग्यवान आहे, कारण ती इंनटरनेटच्या युगात घडत आहे. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्याला आपल्याला पाहिजे त्या शिक्षकाकडून ज्ञान घेता येईल. आजही शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
पाटोदा आणि पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वोतोपरी मदत करणार आहोत, मागास, वंचित घटकांना ज्ञानदान करणार्या शाळा टिकल्याच पाहिजेत. गणवेशामुळे कोणता मुलगा साहेबांचा आहे आणि कोणता मुलगा शेतकरी, शेतमजूराचा आहे हे कळत नाही. गणवेश सर्वांना समान पातळीवर ठेवतो. गणवेश हा समानतेचे तत्व घेवून जोडणारा धागा आहे. सदैव आई – वडील व शिक्षकांचा जीवनामध्ये सर्वांनी आदर करावा. गणवेशामुळे एकता निर्माण होऊन आपली व समाजातील सर्वांची ठळकपणे ओळख निर्माण होते. त्यामुळे सर्वच घटकांत गणवेश महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी मातृभाषेसोबतच इंग्रजीचे ज्ञान अवगत करून घ्यावे. त्यामुळे जगाची सहज ओळख होते, असे प्रतिपादन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले.
अध्यक्षीय समारोप सरपंच बाळासाहेब देशमुख यांनी केला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पाडुळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मुकुंद सोनवणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षक अशोक यादव यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होता.