टीम AM : देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे झाली. अंबाजोगाईला मात्र अद्याप रेल्वे आलीच नाही. नागरिकांनी अनेक वेळा मागणी केली, शासन दरबारी निवेदने दिली. परंतु, रेल्वेमात्र आलीच नाही. अनेकांनी रेल्वेचा प्रवास अनुभवला देखील नाही.
अंबाजोगाईला रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी येथील जनता पन्नास वर्षांपासून मागणी करीत आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. येथील दोन लोकप्रतिनिधी केंद्रीय मंत्री झाले. परंतु, त्यांनी अंबाजोगाई रेल्वे मार्गाकडे दुर्लक्ष केले. सामाजिक कार्यकर्ते भारत पसारकर यांनी अनेकवेळा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदने पाठविली, हजारों पोस्टकार्ड पाठविली, पाठपुरावा केला.
तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री जयसिंग गायकवाड यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला होता. माजी खासदार कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे यांनी घाटनांदूर – अंबाजोगाई या आठरा किलोमीटर रेल्वे मार्गाची मागणी दिल्लीच्या लोकसभेत केली होती. त्यावर रेल्वे मंत्र्यांनी केवळ अश्वासन दिले होते.
माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी मनावर घेतले असते तर मागेच रेल्वेमार्ग झाला असता. त्यांनीही या मागणीकडे दुर्लक्ष केले. स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
गटबाजी, पक्षभेद विसरून नागरिकांनी एकत्रित येऊन रेल्वे मार्गाची मागणी करण्याची गरज
घाटनांदूर – अंबाजोगाई या रेल्वे मार्गाचा सर्व्हे झाला. परंतू, प्रत्यक्ष काम झाले नाही. त्यानंतर घाटनांदूर – दौंड रेल्वे मार्गाचा सर्व्हे करण्यात आला. मात्र, बजेटअभावी कामे रेंगाळली. अंबाजोगाई – गुलबर्गा या नवीन रेल्वे मार्गाची मागणी माजी प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी लाऊन धरली होती. गटबाजी व पक्षभेद विसरून सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन नवीन रेल्वे मार्गाची मागणी करण्याची खरी गरज आहे. पंतप्रधान, रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे, खासदार रजनी पाटील यांच्याकडे भेटून निवेदने देऊन पाठपुरावा करण्याची गरज आहे.
आधुनिकीकरणाला होईल प्रारंभ
अंबाजोगाई परिसरात नवीन रेल्वे मार्ग सुरु झाल्यास शहराचा सर्वांगिण विकास होणार आहे. व्यापारपेठ सुधारणार आहे, भौतिक विकास होईल, उद्योगधंदे व पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, शहराच्या आधुनिकीकरणाला प्रारंभ होईल.
शहरीभागात मेट्रोवर नवीन मेट्रो गाड्या सुरु होत आहेत. अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागात साध्या रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याची खंत वाटते. स्थानिक नागरिकांच्या एकत्रित विचार मंथनाने रेल्वे मार्गाचा गुंता सुटणार आहे.