अंबाजोगाईत अतिक्रमणावर हातोडा : छत्रपती शिवाजी महाराज चौकातील, मेडिकल परिसरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात

नगरपरिषद, पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई

अंबाजोगाई : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आणि मेडिकल परिसरातील कॉम्प्लेक्समधील गाळ्यातील अपात्र आणि अनाधिकृत कब्जा केलेल्या अतिक्रमणावर नगरपरिषद प्रशासनाने आज हातोडा चालविला. नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत ही अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली. दरम्यान यावेळी ‌‌‌तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि  मेडिकल परिसरात नगरपरिषदेने काही वर्षांपूर्वी गाळे बांधले होते. या दोन्ही ठिकाणच्या गाळ्यात अपात्र  आणि अनाधिकृत अतिक्रमणे होती. नगरपरिषदेने वारंवार नोटीसा देऊनही ही अतिक्रमणे काढली जात नव्हती. नंतरच्या काळात काही जणांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

नगरपरिषदेच्या या गाळ्यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देखील अंबाजोगाईत येऊन गाळेधारकांचे म्हणणं ऐकून घेत काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. दरम्यान उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन नगरपरिषदेला या दोन्ही ठिकाणी असलेल्या गाळ्यातील अपात्र आणि अनाधिकृत अतिक्रमणे काढण्यास सांगण्यात आले. त्यानुसार नगरपरिषदेने अपात्र आणि अनाधिकृत कब्जा केलेल्यांना 1 ऑगस्टपर्यंत अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. काही जणांनी यावर स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न केले, परंतू त्यांना अपयश आले. त्यामुळे नगरपरिषदेने ‌‌‌सदरिल अतिक्रमणे आजपासून काढण्यास सुरुवात केली.

नगरपरिषदेच्या या दोन्ही ठिकाणच्या गाळ्यात जवळपास 68 गाळे अपात्र आणि अनाधिकृत आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शक आणि उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार आम्ही ही अतिक्रमणे काढून घेणार आहोत, असे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

अतिक्रमणे काढताना तगडा पोलिस बंदोबस्त

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आणि मेडिकल परिसरातील कॉम्प्लेक्समधील गाळ्यातील अतिक्रमणे काढताना तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगरपरिषदेची पुर्ण टीम या ठिकाणी हजर राहून अतिक्रमणे काढत होती. अतिक्रमणे काढल्यानंतर त्या ठिकाणचा फोटो काढत गाळा सील करण्यात येत होता.