घाटनांदूर : विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्क राहून मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करावा, असे प्रतिपादन अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी केले.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील सोमेश्वर विद्यालयात आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. सायबर क्राईमचा धोका टाळण्यासाठी तसेच सायबर क्राईमबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोमेश्वर विद्यालयात बुधवारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोरे बोलत होते.
जिल्ह्यात वाढत्या सायबर क्राईमच्या घटना लक्षात घेता सायबर क्राईमबद्दल जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजाला अपेक्षित नसणारे वर्तन म्हणजेच गुन्हा असतो, म्हणून मोबाईल, कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करताना कुठल्याही प्रकारचा सामाजिक, धार्मिक किंवा सांप्रदायिक तेढ निर्माण करणारा संदेश आपल्याकडून फॉरवर्ड तर होत नाही ना याचे भान आपल्याला असले पाहिजे.
सोशल मीडियावर आलेला कोणत्याही प्रकारचा संदेश खरा आहे की खोटा याची शहानिशा केल्याशिवाय तो फॉरवर्ड करू नका. तसेच पैशाच्या आमिषाला बळी न पडता आपल्या बँक डिटेल्सची गोपनीयता बाळगा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक डिटेल्स देऊ नका. सायबर क्राईमच्या माध्यमातून आता चाइल्ड पॉर्नोग्राफी सारखे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत सतर्क राहणे महत्त्वाचे आहे, असे मोरे यांनी सांगितले.
यावेळी या मार्गदर्शन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्यासह खंदारे, जमादार शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गणेश जाधव आणि प्राचार्य दि. ना. फड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा देशमुख यांनी केले.