अपघातात पोटचा गोळा गमावलेली माय : एक गाय !

ॲड. संदीप थोरात 

यशवंतराव चव्हाण चौक ते पाण्याची टाकी या रस्त्याच्या कामाने अनेकांचे अपघाती बळी घेतले आहेत. बळी गेलेले माणसे असल्याने त्यांची चर्चा तरी झाली. पण प्राण्यांचे अपघाती बळी तर चर्चेतच येत नाहीत. आज पहाटे असाच एक प्रकार घडला. 

मी सकाळी सहा वाजता दूध घेण्यासाठी गेलो असता हॉटेल समोरील रस्त्यावर गायीचे दोन वासरे अपघाती मरण पावल्याचे दिसून आले. पहाटेच वाहनाने धडक दिल्याने ते मृत्यूमुखी पडले होते. त्यातले एक तांबड्या रंगाचे वासरू तर अगदी दुध पिते होते. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या त्या वासरांच्या मृतदेहाला टाळून मार्गक्रमण करत होत्या. 

लोकांची मोकाट जणावरांवर मोकाट चर्चा सुरु होती. हळूहळू वाहनांची गर्दी वाढायला लागली. तेव्हड्यात प्राण्यांशी व मातीशी इमान असणाऱ्या काही तरुणांनी त्या वासरांचे मृतदेह ओढून बाजूला घेतले. त्यांनी छोट्या वासराला हात लावताच एक गाय जोरजोराने हंबरत तेथे आली. ती जोरजोराने ओरडत त्या वासराच्या जवळ जवळ जाऊ लागली. तिच्या त्या आक्रोशाने, हंबरण्याने क्षणभर उपस्थित सर्वांच्याच काळजात कालवा कालव सुरु झाली. गाय सारखी हंबरत होती. नंतर काही वेळाने त्या वासरांचे मृतदेह इतरत्र नेण्यात आले.

मी आकरा वाजता रस्त्यावर गेलो असता ती गाय पून्हा त्याच ठिकाणी हंबरत फिरत असल्याचे दिसले. मी पून्हा पाच वाजता कामानिमित्त बाहेर निघालो असता ती गाय रस्त्याच्या कामामुळे जिथे रस्ता खंडीत झाला आहे, त्या ठिकाणी पाटीजवळ उभी राहून ज्या ठिकाणी वासराचा अपघात झाला, त्या अपघात स्थळाकडे पाहून सारखी हंबरडा फोडत होती. पण आता तिच्या हंबरड्याचा आवाज निघत नव्हता. हंबरून हंबरून तिचा गळा बसला होता. तिच्या डोळ्यातले दु:ख हृदय पिळवटून टाकणारे होते ! 

ती जणू रस्ता करणाऱ्यांना, वाहनाने बळी घेणाऱ्यांना जाब विचारत होती ! आपल्या गेलेल्या वासराला हाका मारत होती ! तिचे पोट खपाटीला गेले होते पण कासेचा पान्हा मात्र दाटून आलेला होता. आपले पिते वासरू गेल्याच्या दुःखाने घायाळ झालेली ती माय पाहून मलाही क्षणभर गलबलून आले. बारा – तेरा तास उलटून गेले पण ती गाय या परिसरातून जायला तयार नाही. सारखी त्या अपघात स्थळावर चकरा मारत आहे ! निसर्गाने या मायेचे दुःख हलके करावे ! तिला आपल्या गेलेल्या बाळाच्या दुःखातून मुक्त करावे !