प्रहार संघटनाही लढवणार निवडणूक
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात कालपासून पावसाचा जोर जसा कायम आहे त्याप्रमाणे नगरपरिषद निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोर धरत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी काँग्रेस – वंचित – अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडी आणि प्रहार संघटना मैदानात उतरली आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणूकीत यावेळी ‘कांटे की टक्कर’ होणार असं चित्र दिसून येत आहे.
सुप्रीम कोर्टाने राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूकांना स्थगिती देण्यास नकार दिल्याने आता ओबीसी आरक्षणाशिवाय ठरलेल्या वेळेतच निवडणूका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषद निवडणूकींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून इच्छूक उमेदवारांसाठी अर्ज मागविले आहेत. त्यानंतर लागलीच काँग्रेसचे शहराध्यक्ष असिफोद्दीन खतीब – वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे आणि अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे प्रमुख नंदकिशोर मुंदडा यांनीही इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागविले आहेत. त्यासोबतच प्रहार संघटनेनं देखील निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली असून त्यांनीही उमेदवारांसाठी अर्ज मागविले आहेत. लवकरच या सर्व पक्षाच्या, संघटनेच्या आणि आघाडीच्या इच्छुक उमेदवारांसाठी प्रत्यक्ष मुलाखती होणार आहेत.
अंबाजोगाई नगरपरिषदेत गेल्या 20 ते 25 वर्षांपासून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचे नगरसेवक कमी निवडून आले तरी जनतेतून नगराध्यक्ष असल्याने अटीतटीच्या लढतीत त्यांनीच बाजी मारली. विरोधकांना आपलेसे करत त्यांनी पाच वर्षे सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवल्या. मध्यंतरीच्या काळात काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
गेल्या पाच वर्षांत बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी निवडणुकीला सामोरे जात आहेत तर दुसरीकडे त्यांना शह देण्यासाठी विरोधकांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. कांग्रेस – वंचित बहुजन आघाडी, अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडी आणि प्रहार संघटनाही निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाली आहे. अजून बरीच प्रादेशिक पक्ष, संघटना नगरपरिषद निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांचीही तयारी सुरू आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे, त्यामुळे नगरपरिषद निवडणूकीत रंगत वाढली आहे, हे मात्र निश्चित आहे.