16 तारखेला प्रत्यक्ष मुलाखती
अंबाजोगाई : सुप्रीम कोर्टाने राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूकांना स्थगिती देण्यास नकार दिल्याने आता ओबीसी आरक्षणाशिवाय ठरलेल्या वेळेतच निवडणूका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषद निवडणूकींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून इच्छूक उमेदवारांसाठी अर्ज मागविले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आ. संजय दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ. पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. राजकिशोर मोदी यांच्या राज पेट्रोलियम (रिलायन्स पेट्रोलियम) येथील कार्यालयात तसेच माजी आमदार संजय दौंड यांच्या निवासस्थानातील कार्यालयात इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज अंबाजोगाई शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मागविण्यात येत आहेत.
सदरिल अर्ज दोन्ही कार्यालयात उपलब्ध असून, हे अर्ज संपूर्ण माहिती भरून दि. 15 जुलै 2022 रोजी संध्याकाळपर्यंत कार्यालयात सादर करावेत, तसेच दिनांक 16 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून राजस्थानी मंगल कार्यालयात संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, माजी आ. संजय दौंड, राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे, बबन लोमटे, शहराध्यक्ष अलीम भाई यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.