श्रीनिवास बेलसरे
शेक्सपियरची अनेक वाक्ये 400 वर्षानंतर आजही लोकांच्या मनात ताजीतवानी आहेत. ‘मॅकबेथ’ या नाटकात त्याने जीवनाची व्याख्या फार तटस्थपणे करून ठेवली आहे. तारुण्यातील भावभावनांचा पूर ओसरून गेल्यावर माणसाच्या व्यक्तिमत्वात एक तटस्थपणा येत असतो. ही परिपक्वता आली की त्याला अशा स्थळकाळाची बंधने पार करून टिकलेल्या विचारवंताचे एरव्ही न पटलेले विचार पटू लागतात. मग एखादा विचार सकारात्मक आहे की नकारात्मक हा प्रश्नच बाजूला पडतो. ‘मॅकबेथ’ मध्ये शेक्सपियर जीवनाबद्दल लिहितो.
‘जीवन काय असते? आपल्याबरोबर सतत चालणारी एक सावली! एखाद्या महानाट्यातले एक सुमार पात्र, जे त्याच्या क्षणिक संवादासाठी अडखळत अवतरते…. आणि लगेच विंगेत निघून जाते, कायमचे विस्मृतीत जाण्यासाठी! जीवन असते एखाद्या वेडपटाने पुटपुटलेली, कोलाहल आणि भयकारी घटनांनी भरलेली, पण एक अर्थशून्य कथा! निरर्थक, पूर्णत: निरर्थक, कथा !’
‘दिल अपना और प्रीत पराई’ या 1960 साली आलेल्या सिनेमासाठी शैलेंद्रने एक जबरदस्त गाणे लिहिले होते. राजकुमार, मीनाकुमारी आणि नादिरा यांच्यात घडलेल्या शोकांतिकेचे दिग्दर्शक किशोर साहू यांनी शेवटी सुखांतिकेत रुपांतर केले होते. शेक्सपियरसारखाच सूर लावत शैलेन्द्रने गाण्याच्या सुरवातीलाच सूचित केले होते.
‘आयुष्य ही किती विचित्र कथा आहे, जी कधी सुरु होते आणि कधी संपते ते कळतही नाही आणि शेवटपर्यंत तिचा काही अर्थ लागतच नाही’ या पहिल्याच ओळीतून व्यक्त होनाऱ्या अनुभवाच्या सार्वत्रिकतेमुळे गाणे अतिशय लोकप्रिय झाले ! या सिनेमाने शंकर – जयकिशन यांना 1961 चे सर्वोत्कृष्ठ संगीत दिग्दर्शनाचे फिल्मफेयर पारितोषिकही मिळवून दिले !
आजही जाणत्या सिनेरसिकांत हे गाणे कमालीचे लोकप्रिय आहे. शेक्सपियरने म्हटले होते ‘जीवन ही कोलाहल आणि भयकारी घटनांनी भरलेली निरर्थक कथा आहे’ आणि आपला शैलेन्द्र तोच अर्थ थोड्या वेगळ्या शब्दात मांडतो.
‘अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहाँ ख़तम
ये मंज़िलें है कौनसी, न वो समझ सके न हम’
शंकर – जयकिशन यांनी गाण्याला त्यांच्या नेहमीच्या ढंगात ऑर्केस्ट्रासारखे झगमगीत संगीत दिले असले तरी चाल अशी ठेवली होती की तुटत असलेल्या प्रेमकथेची वेदना प्रेक्षकाला सतत जाणवत राहते. गाणे संपले तरीही एक हुरहूर कितीतरी वेळ मनाला घेरून उरते. आतल्याआत चुकचुकत राहते. त्यात लतादीदींचा आवाज म्हटल्यावर गाणे खरेच एक ‘अजीब’ अनुभव देणारेच बनून गेले आहे. गाण्याच्या पुढील ओळी अलगद कथानकाला पुढे नेतात.
डॉक्टर सुशीलच्या (राजकुमार) दवाखान्यातील नर्स करुणा (मीना कुमारी) त्याच्या प्रेमात पडलेली आहे. तो गरिबीत आणि मोठ्या कष्टाने डॉक्टर झालेला आहे. त्याच्या लग्नाची वेळ येते तेंव्हा त्याची आई त्याला ज्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी मदत केली त्यांचे ऋण फेडण्याची गळ घालते. आणि त्यातून त्या उपकारकर्त्याच्या मुलीशी, म्हणजे कुसुमशी (नादिरा) सुशीलचे लग्न होते. लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी इस्पितळाचे कर्मचारी बोटिंगला चालले आहेत. त्यावेळी करुणाला, लोकांच्या आग्रहास्तव, गाणे म्हणावे लागते. तेच हे गाणे !
ती आपले मुग्ध, अव्यक्त प्रेम आणि त्यातून आलेली निराशा लपवत गातेय. तरीही तिच्या तोंडातून आपोआपच आपले दु:ख व्यक्त करणारे शब्द येतात..
‘ये रौशनीके साथ क्यूँ, धुआं उठा चिरागसे
ये ख्वाब देखती हूँ मैं, के जग पड़ी हूँ ख्वाबसे ?
अजीब…’
अनेकदा प्रेमात हे असे वळण येतेच. जेंव्हा प्रिय व्यक्तीच्या जीवनात सुरु झालेल्या आनंद सोहळ्यातून प्रेमिक नकळत बाहेर फेकला जातो किंवा जाते. एकाच्या जीवनात जेंव्हा रोषणाई होत असते तेंव्हा दुसऱ्याच्या भावविश्वात मात्र अचानक अंधारून आलेले असते.
त्याच्या निराश मनाला वाटू लागते.. ‘जे डोळ्यासमोर घडते आहे ते एक भयानक स्वप्न तर नाही ना ? की आपण आजपर्यंत समजत होतो तेच स्वप्न होते ? …आणि त्या सुंदर स्वप्नातून आपल्याला आताशी कुठे जाग येतीये ?’ कितीही प्रतारणा झाली तरी खरे प्रेम आपल्या प्रिय व्यक्तीला सोडून जाताजाता सद्भावनांचा, अभिनंदनाचा नजराणाच देऊ इच्छित असते. तिचे मन म्हणते, हरकत नाही तू दुसऱ्या कुणाच्या जीवनात उजेड बनून जातो आहेस. कुणाच्या तरी इतका जवळ गेला आहेस की इतर सर्वांपासून आता कायमचा दूर होऊन गेला आहेस.
‘मुबारकें तुम्हें के तुम, किसीके नूर हो गए
किसीके इतने पास हो, के सबसे दूर हो गए
अजीब दास्ताँ है ये…’
आता तूला दुसऱ्या कुणाचे तरी प्रेम मिळणार आहे. त्यातून तू स्वत:चे एक नवे जग निर्माण करशील. पण माझ्या जीवनातली ही संध्याकाळ मात्र आता मनात कायमची कोरली जाईल. ती जेंव्हा जेंव्हा येईल तेंव्हा तुझी आठवण तीव्रपणे येत राहील, इतकेच!
किसीका प्यार ले के तुम, नया जहां बसाओगे
ये शाम जब भी आएगी, तुम हमको याद आओगे
अजीब दास्ताँ है ये…
पण प्रेमाची बाजी हरलेल्या व्यक्तीच्या बाबतीत फक्त एवढेच असते का ? प्रत्येक वर्षी फक्त त्याच दिवशी ती जीवघेणी आठवण त्याच्या मनाला घेरून टाकते का ? की मनात एका अंधारलेल्या गूढ कोनाड्यात ती सतत तेवत असते, त्या वेदनेची काजळी, रोजच जमा करत असते ?
खरे तर ‘मेरे हमदम मेरे दोस्त’ मधील रफीच्या नितळ आवाजातील मजरूह सुलतानपुरींच्या गाण्यासारखे ‘हुवी शाम उनका खयाल आ गया, वही जिंदगी का सवाल आ गया’ अशी ती जाणीव असते. अशी निर्णायक संध्याकाळ तर आयुष्यभरासाठी त्या दुरावलेल्या मनाचा गाभारा अंधारून टाकत नसते का ?.