मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा उद्या विधीमंडळ अधिवेशनात फैसला होणार असतानाच आज राज्य मंत्रिमंडळाने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात मराठवाड्यातील औरंगाबाद शहराचे संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी करण्यात आली होती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात येईल, अशी माहिती कालच परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. त्यानंतर आज अखेर या दोन्ही शहराच्या नामांतराला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मंगळवारी देखील कॅबिनेटची बैठक झाली. 24 तासात राज्य मंत्रिमंडळाची दुसरी बैठक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या बैठकीसाठी मंत्रालयात उपस्थित होते.