शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव : बंडखोर आमदारांचा गट उद्या मुंबईत येणार
मुंबई : राज्य सरकारनं उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. यासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि विधीमंडळ सचिवालयाला पत्र लिहिलं आहे. त्यामुळे उद्या ‘मविआ’ सरकार सत्तेत राहते की, पायउतार होते याचा फैसला होणार आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
उद्या सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं आणि बहुमत चाचणीची प्रक्रिया संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करण्यात यावी, असं राज्यपालांनी या पत्रात म्हटलं आहे. काही नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्य पाहता विधानभवनात आणि विधानभवनाबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात यावी, जेणेकरून बहुमत चाचणीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल, सभागृहाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं, आमदारांना त्यांच्या जागेवर उभं राहून शिरगणतीद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडावी, कोणत्याही कारणास्तव बहुमत चाचणीची प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही, बहुमत चाचणीच्या प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात यावं आणि त्याचा अहवाल आपल्याकडे सोपवण्यात यावा, अशा सूचना राज्यपालांनी दिल्या आहेत.
शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलावणं घटनाबाह्य असल्याचं सांगत शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पक्षाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर संध्याकाळी पाच वाजता तातडीची सुनावणी घेतली जाणार आहे.
कायद्याचं पालन झालं तर आमचा नक्की विजय
कायद्याचं पालन झालं तर आमचा नक्की विजय होईल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेतल्या 12 आमदारांची फाईल प्रलंबित आहे, मात्र अविश्वास दर्शक ठरावाच्या मागणीवर लगेच निर्णय घेतला जातो, असा आरोप राऊत यांनी केला.
बंडखोर आमदारांचा गट उद्या मुंबईत
दरम्यान, शिवसेनेचा बंडखोर गट उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत येणार आहे. त्यात सर्व आमदार सहभागी होतील, अशी माहिती बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिली. सगळ्या आमदारांनी आज गुवाहाटी मध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते गोव्याला जाणार असून, उद्या सकाळी सगळे आमदार मुंबईत दाखल होणार आहेत.