मुंबई : महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेला बसलेले 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागातून नोंदणी केलेल्यांपैकी 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थी बसले होते. यापैकी 15 लाख 21 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
पुन्हा परीक्षा देण्यासाठी नोंदणी करणाऱ्या 54 हजार 159 जणांपैकी 52 हजार 351 जणांनी परीक्षा दिली. यातील 41 हजार 390 उत्तीर्ण झाले. हा निकाल 79.06 टक्के आहे. विभाग पातळीवर कोकणात सर्वाधिक 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिकचा निकाल सर्वात कमी म्हणजे 95.90 टक्के लागला.
दहावीच्या परीक्षेत 96.06 टक्के मुलं आणि 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा 1.90 टक्क्याने जास्त आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेत 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 50 हजार 779 प्राविण्यासह तर 5 लाख 70 हजार जण प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले. परीक्षेत 2 लाख 58 हजार जण दुसऱ्या श्रेणीत तर 42 हजार 170 जण तिसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाले.
या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातल्या 22 हजार 921 शाळांतील 16 लाख 38 हजार 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.