दैनिक वार्ताचा नगरभूषण शेख मुख्तार, सद्भावना डॉ. संतोष देशपांडे तर युवा गौरव पुरस्कार रुपेश चव्हाण यांना जाहीर

19 जूनला अंबाजोगाईत होणार मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण आणि वर्धापन दिन सोहळा

अंबाजोगाई : अंबाजोगाईत गेल्या 14 वर्षांपासून अखंडितपणे सकारात्मक पत्रकारितेच्या मुल्यांना अनुसरुन दैनिक वार्ता प्रकाशित होत आहे. गेल्या 14 वर्षांचा यशस्वी प्रवास पार करुन 15 व्या वर्षात वार्ताने पदार्पण केले आहे. तरी या निमित्ताने वार्ता समूहाच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा नगरभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते शेख मुख्तार, सद्भावना पुरस्कार डॉ. संतोष देशपांडे तर युवा गौरव पुरस्कार युवा उद्योजक रुपेश चव्हाण यांना जाहीर झाला आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, महाराष्ट्रातील लोकप्रिय युवा व्याख्याते गणेश शिंदे व आयबीएन लोकमतचे वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार असून हा सोहळा व 14 वा वर्धापन दिन  येत्या रविवारी दि.19 जूनला सायंकाळी 5.30 वाजता मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे पार पडणार असल्याची माहिती वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी दिली आहे.

अंबाजोगाई शहरात दैनिक वार्ता हे वृत्तपत्र गेल्या 14 वर्षापासून सातत्याने प्रकाशित होत आहे. सकारात्मक पत्रकारितेची मुलतत्वे सोबत घेवून अंबाजोगाई शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या विषयावर प्रकाशझोत टाकून आपली पत्रकारिता निभावली आहे. पत्रकारितेचा काळ हा खडतर असला तरी सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून पुढचे पाऊल टाकण्याचा प्रयत्न असतो. 14 वर्षांचा यशस्वी प्रवास पार करुन 15 व्या वर्षांत पर्दापण केले आहे. त्यानिमित्ताने 14 वा वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. 

दरवर्षी अंबाजोगाईच्या 3 भुमिपुत्रांना पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. अंबाजोगाईचे भुमिपुत्र हे विविध क्षेत्रात आपले योगदान देवून शहराचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव वर्धापन दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते केला जातो. ज्यातून नव्या पिढीला हे कर्तबगार तरुण पथदर्शी ठरतील आणि ज्या मातीतून हे कर्तृत्ववान जन्माला आले त्यांचाही सन्मान होईल, ही त्यामागची भुमिका असते. 

यंदाचा नगरभूषण पुरस्कार हा अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी गेल्या 20 वर्षात 137 बेवारस व निराधार मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेले आहेत. ज्यामध्ये विविध असाध्य आजारांनी ग्रासले होते. शिवाय कोरोना काळात जवळपास 1200 विविध जाती धर्माचे मयत होते, त्यांच्यावरही संस्कार करण्याचे काम शेख मुख्तार यांनी केले. सद्भावना पुरस्कार हा लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलचे सदस्य तथा मेडिसीन विभागाचे डॉ. संतोष देशपांडे यांना देण्यात येणार आहे. डॉ. संतोष देशपांडे यांनी कोरोना काळात केलेले काम गौरवनिय ठरले आहे. शिवाय डॉ. देशपांडे यांनी अंबाजोगाई तालुक्यात सहा वर्ष आणि विवेकानंद हॉस्पिटल लातूर येथे 10 वर्ष अशी सेवा केलेली आहे. अंबाजोगाई व परिसरातील रुग्णांना चांगला उपचार मिळावा, यासाठी त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. 

युवा गौरव पुरस्कार युवा उद्योजक रुपेशकुमार चव्हाण यांना देण्यात येणार आहे. रुपेश चव्हाण यांनी या परिसरात इकोसेंण्ड हा प्रकल्प प्रथम राबवला. गेल्या 20 वर्षांपासून जनाई स्टोन क्रशरच्या माध्यमातून त्यांचा व्यावसायिक प्रभाव हा इतरांवर राहिलेला आहे. तरुणाईमध्ये त्यांना आयडॉल मानले जाते. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 19 जूनला सायंकाळी 5.30 वाजता मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे होणार आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी हे राहणार आहेत. तर या प्रसंगी केजचे अति. पोलिस अधिक्षक तथा आयपीएस पंकज कुमावत, महाराष्ट्रातील लोकप्रिय युवा व्याख्याते गणेश शिंदे व आयबीएन लोकमतचे वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांच्यासह नांदेड येथील सां. बा. विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, बालरोगतज्ञ डॉ. रेड्डी, डॉ. नितीन चाटे, केज येथील नगरसेवक हारुणभाई इनामदार, शासकीय ठेकेदार विलास थोरात, औरंगाबाद येथील उद्योजक अनिल सांगळे, प्रतिभा इलेक्ट्रीकलचे इंजि. प्रतापराव पवार, मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील यशस्वी व किर्तीवंत यांचा विशेष गौरव केला जाणार आहे. ज्यामध्ये स्त्रीरोगतज्ञ डॉ. मनिषा फड, प्राचार्य शाहूराव गुळभिले, डॉ. अरुणा केंद्रे, युवानेते पियुष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते हकीमलाला पठाण, विनोद पोखरकर, अशोकराव केदार, अधिपरिचारक सय्यद नजीर, कु. वैष्णवी शिंदे, छत्रपती शिवाजी महाराज पुरुष बचत गट, जवळगाव, एसएनएस पद्मावती महिला बचत गट, हातोला यांचा समावेश आहे. तरी 14 वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, अ. भा. मराठी पत्रकार परिषद, शाखा अंबाजोगाई , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अंबाजोगाई, पत्रकार संघ, अंबाजोगाई व गुड मॉर्निंग ग्रुप यांनी केले आहे.