खळबळजनक : ‘स्वाराती’ परिसरात सापडले अर्भक, पोलिसांकडून तपास सुरू

अंबाजोगाई : ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या चनई रोडवरील वस्तीगृहाच्या परिसरात स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज दिनांक 4 जूनला शनिवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात चनई रोडवर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतीगृह आहे. शनिवारी सकाळी या वस्तीगृहाच्या संरक्षक भिंतीजवळ एका कर्मचाऱ्याला स्त्री जातीचे अपूर्ण वाढ झालेले अर्भक मृतावस्थेत आढळून आले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक भटका कुत्रा हे अर्भक तोंडात पकडून घेऊन आला आणि वसतीगृहाजवळ टाकून गेला.

कर्मचाऱ्यांकडून सदरिल घटनेची माहिती मिळताच ‘स्वाराती’ प्रशासनाने तातडीने ही माहिती शहर पोलिस ठाण्यास दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा केला आहे. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलिस करित आहेत.