केज विधानसभा मतदार संघ : मौजे लहूरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यास मान्यता

माजी आ. पृथ्वीराज साठे यांच्या प्रयत्नांना यश

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदार संघातील मौजे लहूरी, ता. केज या ठिकाणी विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. केज विधानसभा मतदारसंघाचे माजी. आ. पृथ्वीराज साठे यांच्या प्रयत्नांना यश आले असून तशा आशयाचे पत्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आ. साठे यांच्यासह ग्रामस्थांना देण्यात आले.

केज विधानसभा मतदार संघातील मौजे लहूरी, ता. केज या ठिकाणी विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात येऊन सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम व पदनिर्मीती स्वतंत्रपणे करण्यात येईल, असे पत्र आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

केज विधानसभा मतदार संघातील केज तालुक्यातील जवळपास पंधरा ते वीस गावांना या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवेचा लाभ मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे, यासाठी केज विधानसभा मतदार संघाचे माजी आ.पृथ्वीराज साठे पाठपुरावा करत होते.

मौजे लहूरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री ना. धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, लहूरी गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले आहेत.