नगरपरिषद : वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी महिला संघटना आक्रमक : वंचित बहुजन आघाडीनेही दिले निवेदन

काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात

अंबाजोगाई : नगरपरिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी यांच्या निलंबनासाठी शहरातील महिला संघटना आक्रमक झाल्या असून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यासोबतच मुख्याधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीही सरसावली असून त्यांनीही निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगरपरिषदेच्या वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, यासाठी शिवसेना, भाजपा समर्थकांनीही‌ मागणी केली आहे. दुसरीकडे मात्र काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे.

नगरपरिषद, अंबाजोगाईचा कारभार मुख्याधिकारी यांनी हातात घेतल्यापासून चांगलेच चर्चेत राहिले आहेत.‌ सततची गैरहजेरी, कार्यालयातचं बसून कारभार हाकणे, कर्मचाऱ्यांना हीन‌ वागणूक देणे तर कधी कर्मचाऱ्यांच्या पगारी रोखणे आणि असभ्य भाषा वापरणं. महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देत त्रास देणं. याची तक्रार तर एका महिला अभियंत्यांनं थेट राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून असल्या ढिसाळपणाच्या कारभारामुळे अंबाजोगाईकरही त्रस्त झाले आहेत.

महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्यांनी कार्यालयातील महिला उपअभियंत्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला आहे, अशा मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून चौकशी करण्यात यावी. सदरिल घटनेचा आम्ही सर्वपक्षीय महिला निषेध करित आहोत. त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर सर्वपक्षीय महिला तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी निवेदन देताना बसपा प्रदेश सचिव द्वारका पिराजी कांबळे, रिपाइं महिला आघाडी सचिव राणी गायकवाड, राष्ट्रवादी महिला आघाडी सचिव सविता जाधव, शिवकन्या वैद्य, श्यामल धिमधिमे, बिल्कीस पठाण, अनुसया कोळी, विमल पवार, कविता पवार यांच्यासह आदी महिला उपस्थित होत्या.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्याकडे जानेवारी 2022 पासून प्रशासक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. नगरपरिषद मधील महिला उपअभियंत्यांना त्यांच्या पदाचा कार्यभार न देणे. त्यांना शिवभोजनचे केंद्र तपासणे, असे अनावश्यक कामे देऊन खच्चीकरण केले आहे. एक महिला कर्मचारी मागील वर्षभरापासून या अधिकाऱ्याचा त्रास सहन करत आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी अंबाजोगाई शहराचे नाव बदनाम केले आहे. अशा अधिकाऱ्याची अंबाजोगाई शहरातून हकालपट्टी करावी व त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष खाजामिया पठाण,  शहराध्यक्ष गोविंद मस्के, जिल्हा संघटक परमेश्वर जोगदंड, शहर महासचिव नितीन सरवदे, तालुका संघटक लखन बालढे तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात

नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना, भाजपा यांसह विविध महिला संघटनांनी आणि वंचित बहुजन आघाडीनेही मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. परंतू काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अजूनही गुलदस्त्यातचं आहे. एरवी वाढती महागाई आणि देशातील, राज्यातील प्रश्र्नावर आठ दिवसांला निवेदन देऊन आंदोलन करणारी ‌‌‌‌‌‌‌काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस गप्प का ? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांबाबत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते याकडे अंबाजोगाईकरांचे‌ लक्ष आहे.