महिलांना त्रास देणाऱ्या मुख्याधिकारी, कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा – शिवसेना
अंबाजोगाई : नगरपरिषद, अंबाजोगाईचा कारभार मुख्याधिकारी अशोक साबळेंनी हातात घेतल्यापासून चांगलेच चर्चेत राहिले आहेत. सततची गैरहजेरी, कार्यालयातचं बसून कारभार हाकणे, कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देणे तर कधी कर्मचाऱ्यांच्या पगारी रोखणे आणि असभ्य भाषा वापरणं. महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देत त्रास देणं. याची तक्रार तर एका महिला अभियंत्यांनं थेट राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी साबळेंच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि असल्या ढिसाळपणाच्या कारभारामुळे अंबाजोगाईकरही त्रस्त झाले आहेत.
अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अशोक साबळें अंबाजोगाईकरांसाठी काही नाविन्यपूर्ण योजना आखत अंबाजोगाईकरांची मने जिंकतील असं वाटतं होते. शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठ्याचं नियोजन, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि गोरगरिबांच्यासाठी असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा अंबाजोगाईकरांना होती. पण अंबाजोगाईकरांची घोर निराशा झाली असून शहरातील बहुतांश प्रश्र्न ‘जैसे थे’ च आहेत.
दुसरीकडे मात्र, मुख्याधिकारी साबळेंच्या कार्यकाळात नगरपरिषदेवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत आणि त्याच्या चौकश्याही सुरू आहेत, अंबाजोगाईकरांसाठी ही नक्कीच लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे मुख्याधिकारी साबळेंच्या कारभारावर अंबाजोगाईकर नाराज झाले असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महिलांना त्रास देणाऱ्या मुख्याधिकारी, कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा – शिवसेना
अंबाजोगाई नगरपरिषदेमधील महिला अभियंत्यांना त्रास देणाऱ्या मुख्याधिकारी अशोक साबळें आणि नगरपरिषदेमधील कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तात्काळ कराव्यात, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळें महिला अभियंत्यांना त्रास देत आहेत. याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. तशी महिला आयोगाची नोटीसही आल्याची माहिती आहे, यामुळे शहरात सर्वत्र मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे, मध्यंतरी पदोन्नती होऊनही त्यांना येथेच ठेवण्यात आले होते.
कार्यालयात येणाऱ्या लोकप्रतिनिधींचा अपमान करणे, फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाकणे आदी कारणांमुळे मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे, तेव्हा यांची येथून उचलबांगडी करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी केली आहे.