परिचारिकांच्या आंदोलनास ‘डीवायएफआय’ संघटनेचा पाठिंबा

अंबाजोगाई : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने 23 मे पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला आहे.

जागतिक महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा डॉक्टर्स, नर्सेस व स्वच्छता कर्मचारी यांनी दिली आहे. केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने तोंड भरुन देवदूत, कोरोना योद्धे असे म्हणून भरभरुन कौतुक केले. परंतु, त्यांच्या संवेदनशील मागण्यांकडे मात्र पुर्णतः दुर्लक्ष केले. 

राज्यातील डॉक्टर्स व रुग्ण यांचे प्रमाण राखण्यासाठी नवनविन वैद्यकीय महाविद्यालये उघडण्याचा घाट घालणारे शासन, त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा, मनुष्यबळ या अत्यंत महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देत नाही. केरळवरुन नर्सेस व डॉक्टर्स मागवणारे शासन दीड वर्षे उलटूनही परिचारीकांच्या भरतीबद्दल संदिग्धच आहे. भरतीप्रक्रिया चालू असल्याचे सांगून वेळ मारुन नेत असल्याचे दिसत आहे.

राज्यातील सर्व संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे असंख्य अडचणी येत आहेत. अनेकांनी जीवही गमावले आहेत, परंतू शासन गंभीर नाही. यावरुन शासनाची गरज सरो अन् वैद्य मरो  अशीच प्रवृत्ती दिसत आहे. या बाबत परिचारिकांनी 23 मे पासून आंदोलन सुरू केले आहे. त्या अनुषंगाने आज ‘डीवायएफआय’ संघटनेच्या वतीने परिचारिकांच्या राज्यव्यापी आंदोलनाला संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला. यावेळी संघटनेचे माजी राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजय बुरांडे, देविदास जाधव  उपस्थित होते.

परिचारिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ शासनाने आणू नये

शासनाने परिचारिकांच्या आऊटसोर्सिंगद्वारे करण्यात येणाऱ्या पदभरतीचा निर्णय रद्द करून रिक्त जागा त्वरित भराव्यात व परिचारिकांच्या विविध मागण्याबाबत सकारात्मक विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा. परिचारिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ शासनाने आणू नये.- अ‍ॅड. अजय बुरांडे, ‘डीवायएफआय’ माजी राज्य उपाध्यक्ष.