काळजावरं कोरलं नाव आमच्या भीमा कोरेगाव : अजय देहाडेंच्या गायनाने अंबाजोगाईकर आनंदले, तरुणांचा जल्लोष


भीम गीतांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी 

नॉनस्टॉप भीमगीतांनी अंबाजोगाईकरांची जिंकली मने

अंबाजोगाई : काळजावर कोरलं नाव आमच्या भीमा कोरेगाव यासह सादर केलेल्या सुप्रसिध्द गायक झी युवा संगीत सम्राट फेम अजय देहाडेंच्या गायनाने अंबाजोगाईकर आनंदीत झाले. उत्तम संगीत संयोजन आणि ढोल – ढोलकच्या उत्कृष्ट साथसंगतीने तरुणांना ठेका धरायला भाग पाडले. देहाडेंच्या प्रत्येक गाण्यांवर तरुणांनी जल्लोष केला. भीम अनुयायांनीही प्रत्येक गाण्याला दाद देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बोधीघाट येथील जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक 3 मे ला सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे – चेतन चोपडे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात केले होते. 

या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानराव ढगे, डॉ. राहुल धाकडे, तहसीलदार मनीषा जोगदंड, ईश्वर जोगदंड, अनिल लाड, बाळासाहेब सोनवणे, सुनिल व्यवहारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच अंबाजोगाई शहरातील जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यासोबतच सुमेध चव्हाण, वर्षा ढगे, अस्मिता बनसोडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनंत कांबळे यांनी केले.

भीम गीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात उजाड रानी किमया केलीस मोठी, भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी या विजय पवार यांनी गायलेल्या सुरेख आवाजाच्या गाण्याने झाली. सुरुवातीच्याच या गाण्याने उपस्थित भीम अनुयायी भारावून गेले होते. त्यानंतर गायक अजय देहाडेंची इन्ट्री झाली. देहाडेंनी दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या चवदार तळ्यावर या सादर केलेल्या सुरुवातीच्याच गाण्याला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. त्यानंतर देहाडेंनी त्यांच फेमस गाणं काळजावर कोरलं नाव आमच्या भीमा कोरेगाव हे सादर केले. या गाण्याला भीम अनुयायांनी उत्स्फूर्त दाद देत जल्लोष केला. तरुणाई सोबत लहान मुलामुलींनीही ठेका धरला.

भीम अनुयायांचा जल्लोष पाहून अजय देहाडे यांनीही त्याच ताकदीने आणि जोषाने गायन करत आनंद द्विगुणित केला. बाई माझा पोरगा साहेब झाला, आहे बाबासाहेबांचं देणं, गुलामी का टुट गया जालं, ये है मेरे भीम का कमाल, असं हाय का कुणाशी कुणाचं, माझ्या भीमा सारखं नातं या देहाडे यांनी गायलेल्या नॉनस्टॉप भीमगीतांनी भीम अनुयायांची मने जिंकली. अजय देहाडे आणि त्यांच्या टीमने सादर केलेल्या संपूर्ण गाण्यांना अंबाजोगाईकरांनी उत्स्फूर्त दाद देत भरभरुन प्रतिसाद दिला. 

अजय देहाडे यांना साथसंगत अमर वानखेडे – किबोर्ड, अरुण खिल्लारे – ॲक्टोपॅड, गणेश चव्हाण – ढोल, आकाश थोरात – ढोलक, ढोलकी, भूषण चोपडे – ॲक्टोपॅड यांनी केली. बहारदार संचालन चेतन‌ चोपडे यांनी केले.

भीम गीतांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साहेबराव जोगदंड, माऊली मांदळे, महादेव पौळ, अतुल ढगे, बाबाजी मांदळे, स्वप्निल चव्हाण, संघपाल जगताप, बाबासाहेब सरवदे, सुरेश वाघमारे, अमोल गायकवाड, कविराज सोनवणे, अतुल जोगदंड, सोनू कांबळे, लखन शिनगारे यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहरांसह आसपासच्या परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.