पाटोदा (म.) येथील गावकऱ्यांनी दिला सामाजिक ऐक्याचा संदेश
अंबाजोगाई : देशात आणि राज्यात राजकीय स्वार्थ साधण्यासाठी, जाती – धर्मात द्वेष पसरवण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जात असताना कोणताही गाजावाजा न करता अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये समाप्ती दिवशी पवित्र रमजानच्या महिन्यात रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पंगतीचे आयोजन करून राजकारण्यांच्या धार्मिक विद्वेषाला आम्ही गांवकरी कधीच बळी पडणार नाहीत, अशीच बंधुत्वाची परंपरा कायम ठेवणार, असा संदेश या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने पाटोदा गावकऱ्यांनी दिला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा गाव तसे विधायक कामांत नेहमी अग्रेसर असते. विधायक चळवळीत नेहमीच पुढे असण्याची परंपरा या गावाला लाभली आहे. गावात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा गेल्या 26 वर्षांपासून कायम आहे. या सप्ताहात सर्व जातीधर्माचे लोक सहभाग घेतात. रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत सप्ताह उत्साहात साजरा होत असतो.
सप्ताहात मुस्लिम बांधवांतर्फे नाष्ट्याची पंगतही असते. या वर्षी राज्यात अजानचा भोंगा आणि इतर बाबीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करित पाटोदा येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रमजानच्या रोजेदार यांच्यासाठी पंगतीचे आयोजन करून सामाजिक ऐक्याचा मोठा संदेश पाटोदा गावाने आणि गावकऱ्यांनी दिला आहे.
भोंग्याचा त्रास कोणालाच नाही
गुढीपाडव्या दिवशी गावातील मलिंग शहा बाबा पीराचा संदल होता. त्यामध्ये सर्व गांवकरी अगदी उत्साहाने सहभागी होते. अखंड हरिनाम सप्ताहात, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवात सर्व जाती – धर्माचे लोक उत्साहात सहभागी होते. पवित्र रमजानचा महिना सुरू आहे, यामध्ये गावकऱ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग आहे. या सर्व कार्यक्रमात भोंग्याचा वापर आलाच. मात्र, त्रास कोणालाच नाही, असे सर्व गांवकरी एकमुखाने प्रतिक्रिया व्यक्त करित आहेत.