भीषण अपघात : भरधाव कारने चौघांना चिरडले, तिघांचा मृत्यू

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे घडली घटना

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव कारने चौघांना चिरडले असून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल दिनांक 4 एप्रिलला सायंकाळी 10 च्या सुमारास घडली आहे.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई रोडवरुन घाटनांदूरच्या दिशेने कार क्रमांक MH – 24,V 2518 ही भरधाव वेगाने येत घाटनांदूर गावातील पानटपरी समोर बोलत उभे असलेल्या चौघांना जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक दिलेल्या चौघांना जवळपास 100 मीटर कारने फरफटत नेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. वैभव सतिश गिरी (वय 28), लहू बबन काटुळे (वय 30) अशी मृत झालेल्या युवकांची नावं आहेत.

अपघातात रमेश विठ्ठल फुलारी (वय 47), उद्धव निवृत्ती दोडतले (वय 50) आणि कारमधील दोघे गंभीर जखमी झाले‌. रमेश फुलारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले होते. मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. 

दरम्यान, तीन बळी घेणारी ही कार एवढी वेगात होती की तिच्या धडकेने रस्त्यावरील विद्युत खांब देखील पडला आहे. कारमधील तिघेही मद्यधुंद असावेत, असा दावा केला जात आहे. हा अपघात एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या भीषण अपघाताने‌ घाटनांदूर गावावर शोककळा पसरली आहे. ‌