मार्च 2022 अखेर बँकेला 2 कोटीं 51 लाख रुपयांच नफा
अंबाजोगाई : अंबाजोगाई पिपल्स को – ऑप. बँकेने सन 2021- 22 मधील केलेल्या उत्तम कामकाजामुळे 31 मार्च 2022 अखेर बँकेच्या ठेवी 487 कोटी झाल्या असून लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गतवर्षाच्या तुलनेत रुपये 42 कोटीची वाढ झालेली आहे. तसेच बँकेचे कर्ज व्यवहार रुपये 298 कोटी इतके झाले आहे. या आर्थिक वर्षात रुपये 14 कोटी 60 लाख एवढे भाग – भांडवल असून बँकेचा स्वनिधी 33 कोटी 60 लाख एवढा आहे. बँकेची एकूण गुंतवणूक 214 कोटी 24 लाख एवढी आहे. बँकेस 31 मार्च 2022 अखेर 2 कोटी 51 लाख इतका निव्वळ नफा झाला आहे.
सर्व क्षेत्रातील परिस्थिती पाहता बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच कर्जदार, ठेवीदार व सभासद यांच्या सांघिक कामगिरीमुळे बँकेस हे प्रगतीचे उद्दीष्ट साध्य करता आले आहे. मार्च 2022 अखेर बँकेची प्रगती ही बँकेच्या पुढील वाटचालीस नवीन उभारी देणारी असून बँकेच्या सभासदांनी व ग्राहकांनी बँकेवरील विश्वास कायम ठेवल्याची पावती आहे. चालु आर्थिक वर्षात अनंत अडचणी येऊनही बँकेच्या वसुली विभागाने समाधानकारक काम करत बँकेचा निव्वळ एनपीए 2.36 टक्के राखण्यात बँकेस यश मिळवले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर कर्जधारक ग्राहकांचा विचार करुन बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक ठेवण्यास यश मिळवले, असे मत बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी यांनी व्यक्त केले. बँकेचे सभासद, ग्राहक यांचा विश्वास, बँकेचे संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन व बँकेच्या अधिकारी व कर्मचारी वृंदाचे नियोजनबध्द कामकाज यामुळे सन 2021- 22 मध्ये चांगले कामकाज करणे शक्य झाले. अशीच कामगिरी पुढील आर्थिक वर्षातही कायम ठेवण्याचा बँकेचा प्रयत्न असेल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने केवळ अर्थकारणच न करता मागील काळात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत. यंदाचे वर्ष हे बँकेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने शहरात कार्यक्रमाची मांदियाळी दिसून येत आहे. ज्यामध्ये शहरातील गुणिजनांचा सन्मान, रक्तदान शिबीर, कोरोना योध्दा म्हणून डॉक्टर, शिक्षक, स्वच्छता कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी तसेच आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
या बरोबरच महिलांसाठी बँकीग क्षेत्राची माहिती व्हावी, यासाठी बँकीग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. या व अशा इतर अनेक कारणांमुळे बँक ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरली असल्याचे समाधान बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले आहे. या पुढेही वारंवार असेच सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतील, असा संकल्प राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला.