‘स्वरविहार’ च्या बुद्ध – भीम गीतांनी आनंदले अंबाजोगाईकर

अंबाजोगाई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त दिनांक 1 एप्रिलला संघर्षभूमीवर प्रा. राजकुमार ठोके प्रस्तुत ‘स्वरविहार’ या बुद्ध – भीम गीतांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला. 

एकापेक्षा एक सरस गीते सादर करून गायकांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रेक्षकांनीही वेळोवेळी टाळ्यांच्या गडगडाटाने प्रतिसाद दिला. माधव माने यांच्या उत्कृष्ट ध्वनी व्यवस्थेने व प्रकाश व्यवस्थेने सर्वांचाच आनंद व्दिगुणीत केला. 

‘स्वरविहार’ चे निर्माते प्रा. राजकुमार ठोके यांनी  प्रथम नमो गौतमा, भीम सुर्य क्रांतीचा पाहिला विधानात, भीरभीरत्या पाखरांनो संधी ही नामी आली, चांदण्याची छाया कापराची काया, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमा ! घे पून्हा जन्म या दिनांसाठी आदी गीते अत्यंत सुंदररित्या सादर केली. तर माधव माने यांनी उसळत्या रक्ताचा पाडला प्रभाव, सोनियाची उगवली सकाळ व पत्रात लिहते रमा हे तीन गीते सादर केली. स्त्री – पुरुष आशा दोन्ही आवाजात त्यांनी सादर केलेल्या गीतास उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 

अविष्कार एडके या बालकाने ‘जिजाऊ – सावित्री – रमाई माता मला तुमच्यामध्ये दिसावी’ हे गीत अतिशय उत्साहात व जल्लोशात सादर करून रसिकांची दाद मिळवली. विकास एडके यांनी भारत को क्या पुछते हो ! हे हिंदी गीत अतिशय जोशपूर्ण पद्धतीने सादर केले. या गीतासही उपस्थितांनी दाद दिली. क्रांती एडके हिने कुंकू लावीले रमाने हे गीत सादर केले तर कनिष्का ठोके हिने तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे हे गीत सादर केले. या प्रसंगी डॉ. राजेश इंगोले यांनीही पहा पहा मंजूळा हा माझ्या भीमरायाचा मळा हे गीत सादर केले. 

दोन वर्षाच्या प्रदीर्घ खंडानंतर ‘स्वरविहार’ चा सादर झालेला हा बुध्द – भीम गीतांचा कार्यक्रम सर्वांनाच आनंद देणारा होता. ‘भीमजन्मोत्सव’ कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक ॲड. संदीप थोरात यांनी केले. भीमजन्मोत्सवाचा इतिहास, वैशिष्ट्ये व उत्सवाचे भविष्य यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. स्वागत समारोहाचे संचालन पंकज भटकर यांनी केले तर प्रा. किर्तीराज लोणारे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात सामुहीक वंदनेने झाली तर समारोप सरणतंय गाथेने झाला.