राडी – धानोरा रस्त्याची दुरवस्था : ग्रामस्थांना होतोय त्रास

रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील राडी – धानोरा (बु.) या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून या बकाल अवस्थेत असलेल्या रस्त्यांमुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता तात्काळ दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी या भागातील जनतेकडून करण्यात येत आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा (बु.) या गावाला वेगळं महत्त्व प्राप्त आहे.‌ ‘पॉवरग्रीड’ चा मोठा वीजेचा प्रकल्प या गावात आहे. या शिवाय धानोरालगत असणाऱ्या गावांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामीण रुग्णालय आहे. परंतू गावात जाण्यासाठी रस्त्याची अवस्था दयनीय आहे. राडी – धानोरा या 6 किलोमीटर रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. जागोजागी पडलेली खड्डे आणि‌ रस्त्यावर उखडून पडलेली खडी यामुळे अनेकदा रस्त्यावर अपघात झाले आहेत. 

धानोरा ‌‌येथील ‌‌रुग्णालयात केवळ रस्त्याअभावी रुग्ण जाण्याचं टाळतात. या रुग्णालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याबाबतच्या व्यथा माध्यमांसमोर मांडल्या. अनेकदा रात्री – अपरात्री या कर्मचाऱ्यांना जीव‌ मूठीत‌ घेऊन प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत, अशी मागणी या भागातील जनतेकडून करण्यात येत आहे.