डोळ्यांच्या तिरळेपणावरील शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर करून घ्या – डॉ. भास्कर खैरे

27 जणांची तपासणी : 13 रुग्णांवर शस्त्रक्रिया

अंबाजोगाई : डोळ्याचा तिरळेपणा दुर करण्यासाठी तिरळेपणा जाणवणाऱ्या मुलांवर लहान वयातच नेत्र शस्त्रक्रिया करून घ्याव्यात, असे आवाहन ज्येष्ठ नेत्रतज्ञ तथा ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी केले.

येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तिरळेपणा दुर करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत आयोजित करण्यात आलेल्या नेत्र शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन करतांना डॉ. भास्कर खैरे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सदस्य आ. संजय दौंड तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, शल्यचिकित्सक विभागाचे प्रमुख डॉ. नितीन चाटे, डॉ. अभिमन्यु तरकसे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राकेश जाधव, उपअधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, डॉ. शंकर धपाटे, उपअधिक्षक डॉ. विश्वजित पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश अब्दागिरे यांच्यासह आदी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना डॉ. भास्कर खैरे म्हणाले की, तिरळेपणा हा बऱ्याच अंशी लहानपणापासून होणारा आजार आहे. लहानपणी नजर चांगली असेल तर वय वाढत जातांना नजर स्थीर होत जाते, मात्र एका डोळ्याची नजर चांगली असेल आणि दुसऱ्या डोळ्याची नजर कमकुवत असेल तर कमकुवत असलेला डोळा तिरळा होता. त्यामुळे मुलं लहान असतानाच त्यांची नजर सरळ आहे की नाही हे तपासणे आवश्यक असते.      

लहान वयात मुलांच्या नजरेत तिरळेपणा जाणवला तर त्याची नजर सुरुवातीला चष्मा लावून सरळ करण्याचा प्रयत्न केला जातो. याही पुढे जाऊन त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून त्यांची नजर सरळ करता येते व तरुणपणात त्यांच्या डोळ्यावरुन येणाऱ्या समस्यापासून त्यांची सुटका होवू शकते. यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या घरात जन्मलेल्या मुलांची नजर सरळ आहे का नाही याची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे डॉ. खैरै यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात आ. संजय दौंड यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केल्याबद्दल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे कर्मचारी आणि इतरांचे अभिनंदन केले. ही शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात करावयाची म्हटले तर 40 ते 50 हजार रुपयांचा खर्च येतो. हा खर्च सामान्य लोकांना न परवडणारा आहे. त्यामुळे सामान्य लोकांचे हीत लक्षात घेऊन लहान मुलांचा तिरळेपणा घालवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या शस्त्रक्रिया शिबीरात अधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

सदरिल शस्त्रक्रियां यशस्वी करण्यासाठी डॉ. भास्कर खैरे, डॉ. अभिमन्यु तरकसे, डॉ. संकेत निसाले, डॉ. मोहिनी, डॉ.अंकिता, डॉ. कुरमतकर, डॉ. राजश्री व त्यांचे इतर सहकारी डॉक्टर, शस्त्रक्रिया विभागातील परिचारीका आणि इतर स्टाफ यांनी प्रयत्न केले.

27 जणांची तपासणी : 13 रुग्णांवर शस्त्रक्रिया

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या तिरळेपणा घालवण्यासाठीच्या शस्त्रक्रिया शिबीरात लातुर जिल्ह्यातील 27 रुग्णांची तपासणी करण्यात येवून आज 17 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

1600 शस्त्रक्रियांचा विक्रम

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत असलेले प्रख्यात नेत्रतज्ञ अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरै यांनी आजपर्यंत बीड, लातुर, उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील 0 ते 12 वयोगटातील 1600 रुग्णांवर तिरळेपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करणारे भारतात एकमेव डॉक्टर म्हणून डॉ. भास्कर खैरे ओळखल्या जातात. या आजारावर आणि शस्त्रक्रिया पध्दतीवर त्यांचे अनेक शोध निबंध प्रसिद्ध आहेत.