सुरभीच्या माध्यमातून उंचावले अंबाजोगाईचे नाव
अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या मातीने सातत्याने वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. या मातीच्या गुणधर्मातच संस्काराची आणि गुणवत्तेची बीजे रुजलेली आहेत. संघर्षाला सोबत घेवून आणि यशाला खांद्यावर घेवून अंबाजोगाईच्या गुणवंतांची वाटचाल सुरु असते. अंबाजोगाईच्या मातीमध्ये जन्मलेल्या कु. सुरभी राजु गित्ते हिला बिगेनअप रिसर्च इंटेलिजिअंस प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या संस्थेचा राष्ट्रीय स्तरावरील आर्किटेक्चर अॅन्ड इंटिरिअर डिझाइन एक्सलन्स अॅवार्ड नुकताच बेंगलोर येथे प्रदान करण्यात आला.
आर्किटेक्चर अॅन्ड इंटिरिअर डिझाइन्स क्षेत्रात सुरभीने उंची गाठली आहे. तिला मिळालेल्या पुरस्काराच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराची मान आणखी अभिमानाने उंचावली आहे. सुरभी व तिच्या परिवाराचे जिल्हाभरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. सुरभी राजू गित्ते ही महावितरण मधील अभियंता असलेले राजु नाथराव गित्ते यांची कन्या तर संभाजी व दिलीप नाथराव गित्ते यांची पुतणी आहे.
सुरभी हिचा जन्म अंबाजोगाईत झाला असून तिच्यावर या मातीचे संस्कार आहेत. तिने वेगळं काहीतरी करुन दाखवण्याचा संकल्प केला आणि त्या माध्यमांतून तिची वाटचाल राहिली. सुरुवातीला प्राथमिक शिक्षण हे अंबाजोगाईतील गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालय येथे झाले. तर तिचे आर्किटेक्चरचे शिक्षण हे मुंबई विद्यापीठात तर उच्च पदवी ही इंग्लडमधील ऑक्सफोर्ड युनिर्व्हसिटी येथे झाले.
जगभरातील नामांकित अशा विद्यापीठात आर्किटेक्चर या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर तिला जगभरातून नोकरीसाठी ऑफर येवू लागल्या. परंतु तिने या ऑफरला बाजूला सारत आपल्या मायभूसाठी योगदान देण्याची भुमिका घेतली आणि भारतातच करिअर करण्याचे ठरवले. अनेक विचार व संकल्पना मनात येवू लागल्या पण दृढनिश्चय एवढाच होता की, आपल्याला आपल्या देशासाठी व राज्यासाठी काम करावयाचे आहे आणि याचा घटक बनावयाचे आहे. सतत नव्या विषयाचा शोध घेत या क्षेत्रामध्ये तिचे काम अखंडितपणे सुरु राहिले.
सुरभी हिने या क्षेत्रात उंची प्राप्त करुन नवनवे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. तिच्या कामाचे राज्यभर व देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले. नुकताच तिला आर्किटेक्चर अॅन्ड इंटिरिअर डिझाइन एक्सलन्स अॅवार्ड 2022 जाहिर करण्यात आला होता. त्याचे वितरण 24 मार्च रोजी ताजवेस्ट अॅन्ड बॉलरुम बेंगलोर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेेळी उपस्थितांनी सुरभीच्या कार्याचे कौतुक करुन उदयोन्मुख व ट्रेंड सेंटर अर्किटेक्चर अॅन्ड इंटिरिअर फर्मसाठी तिला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुरभी ही नॅशनल एडिशन ताज वेस्ट अॅन्ड बेंगलोरचा एक भाग बनली असल्याची भावना उपस्थितांनी नमुद केली.
सुरभी ही आर. जी. आर्किटेक्स्टसची संस्थापक आहे. तिने या क्षेत्रात अल्पावधीत बहुमोल असे योगदान दिलेले आहे. या पुरस्कार सोहळ्यात जगभरातील व देशभरातील हुशार नोकरशहा, जागतिक नेेते शीर्ष सीईओ आणि राजकारणी यांचा गौरव करण्यात आला. सुरभीच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराची मान अभिमानाने उंचावली आहे. कारण या पुरस्काराने अंबाजोगाई शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. सुरभीला मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वस्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.