घाटनांदूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप

घाटनांदूर : घाटनांदूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

शुक्रवारी गावातील प्रत्येक शाळेतील पाच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन येथील सोमेश्वर विद्यालयात करण्यात आले होते. एकूण चाळीस विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. यात एक डझन रजिस्टर, दहा पेन, कंपास पेटी, एक्झाम पॅड, चित्रकला वही, इरेझर, शार्पनर, कलर पेटी तसेच प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग असे साहित्य देऊन विचारांची शिवजयंती साजरी करण्यात आली. 

कसल्याही प्रकारचे कोचिंग क्लास न लावता नीट परीक्षेत 582 गुण घेऊन ‘एमबीबीएस’ ला प्रवेश मिळवणाऱ्या ज्योती रमाकांत बडे या गरीब व होतकरू विद्यार्थीनीचा मान्यवरांच्या हस्ते तिच्या पालकांना ऍप्रॉन व स्टेथस्कोप भेट देऊन विशेष सत्कारही करण्यात आला. 

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, संपादक आत्माराम मिसाळ, डॉ. समद, जाधव कोचिंग क्लासेसचे संचालक नरसिंग जाधव यांची प्रमुख उपस्थिती तर सोमेश्वर विद्यालयाचे प्राचार्य दि. ना. फड कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी सहशिक्षक रतिकांत कोलपुसे यांनी सुत्रसंचालन केले, प्रास्ताविक गणेश जाधव यांनी तर सहशिक्षक अनिल निकम यांनी शिवचरित्रावर प्रकाश टाकला. शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष उत्सव जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.      

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव जाधव, अक्षय जाधव, लखन पतंगे, सुनिल गरड, धैर्यशील जाधव, सचिन मोरे, विनय जाधव, प्रसाद कदम, चेतन छानवाळ, विशाल जाधव, वचीष्ट जाधव, सिद्धेश्वर जाधव, अजिंक्य जाधव यांनी परिश्रम घेतले.